भिवंडी : अहमदनगरमध्ये दोन शिवसैनिकांच्या हत्येची घटना ताजी असतानाच, भिवंडी तालुक्यातही एका शिवसैनिकाची हत्या झाल्याचे समोर आले आहे. शैलेश निमसे (वये 45 वर्षे) असे या शिवसैनिकाचे नाव आहे.


शैलेश निमसे हे शहापूरचे शिवसेना तालुका उपप्रमुख होते. भिवंडी तालुक्यातील दिघाशी जवळील देवचोळा येथे निमसे यांची निर्घृण हत्या करण्यात आली.

धक्कादायक म्हणजे, निमसेंच्या हत्येनंतर त्यांची ओळख होऊ नये म्हणून त्यांचा मृतदेह पेटवण्यात आला.

निमसे यांचा मृतदेह भिवंडी उपजिल्हा रुग्णालयातून शवविच्छेदनासाठी जे. जे. रुग्णालयात नेण्यात आला आहे.

हत्येचं कारण वैयक्तिक आहे की राजकीय हे अद्याप कळू शकलेलं नाही. तसेच, मारेकरी कोण, याचाही तपास पोलिसांनी सुरु केला आहे.

काही दिवसांपूर्वीच अहमदनगर जिल्ह्यात दोन शिवसैनिकांची राजकीय वादातून हत्या झाली. त्यानंतर अवघ्या काही दिवसातच भिवंडीत शिवसैनिकांच्या हत्येचं प्रकरण समोर आले आहे.