मुंबई : या देशात लोकशाही आणि स्वतंत्र्य टिकवायचं असेल तर विरोधी पक्षांचं महत्व कमी करून चालणार नाही. लोकशाहीमध्ये विरोधी पक्षाचं महत्व कमी झालं तर राजकर्ता हा बेफामपणे वागतो. एकपक्षीय राजवट ही संसदीय राज्यघटनेला मारक आहे, असे मत शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे.

एबीपी माझाशी बोलताना ते म्हणाले की, राजकरणात वैचारिक निष्ठेचा स्तर सांभाळावा लागतो. भौतिक गोष्टींसाठी आणि ईडी, सीबीआय चौकशीसाठी पक्ष बदलणाऱ्या लोकांवर बारीक लक्ष ठेवावं लागत, असेही ते म्हणाले.

24 तासात 24 मिनिटांत मत परिवर्तन, मन परिवर्तन होणं, पक्ष बदलणं यावर संशोधन झालं पाहिजे, असेही राऊत म्हणाले.  सध्याचं राजकारण हे कपडे बदलण्याइतकं सोपं झालं आहे. मात्र आमच्याकडे माणसं पारखून घेतली जात असल्याचं देखील ते म्हणाले.

राजकारणामध्ये पक्षांतर इतकं सोपं झालं आहे की, आता सामान्य लोक सुद्धा त्यांची मज्जा बघतात. यामुळं लोकं गोंधळत आहेत. कार्यकर्ते कोणता झेंडा घेऊ हाती, असे विचारत असल्याचंही ते म्हणाले.

युतीबाबत बोलताना ते म्हणाले की, भाजप अध्यक्ष अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जे ठरवलंय अगदी तसंच होईल. यापेक्षा वेगळं काही होणार नाही, असे राऊत म्हणाले.

288 जागेची तयारी म्हणजे प्रत्येक पक्ष हा महाराष्ट्राचा विचार करतो आणि निवडणुकांच्या दृष्टीने पक्ष विस्तारासाठी पक्षाच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं ऐकून घेण्याचं काम प्रत्येक पक्ष करतोय, असे स्पष्टीकरण देखील त्यांनी यावेळी दिले. युती होणारच असून दोन्ही पक्षाच्या दोन्ही नेत्यांनी एकत्र येऊन विचार केला असल्याचे राऊत म्हणाले.