मी कोणालाही समर्थन देणार नाही हे लिहून देतो. तसंच शिवसेनेनेही लेखी स्वरुपात द्यावं, असं आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी दिलं होतं. त्याला शिवसेनेने उत्तर दिलं.
राष्ट्रवादी भाजपसोबत जाणार नाही हा शरद पवारांचा दावा शंकास्पद आहे. तसंच शरद पवारांचं राजकारण बेभरवशाचं असल्याची भावना शिवसेना नेत्यांची आहे.
पुण्यातील सभेवर निशाणा
पुण्यात मुख्यमंत्र्यांना गर्दीअभावी सभा रद्द करावी लागली, त्यावरही शिवसेनेने निशाणा साधला.
"ही तर सुरुवात आहे. अजून पुढे बरंच बघायचं आहे. जशी लाट येते तशी ओसरते हे रिकाम्या खुर्चा बघून त्यांच्या लक्षात आलं असेल", असं अनिल परब म्हणाले.
नंदलाल समिती अहवालाबाबत आव्हान
मुख्यमंत्र्यांना माझं आव्हान आहे की नंदलाल समितीच्या अहवालात जे ताशेरे त्यांच्यावर ओढण्यात आले आहेत, ते खोटे आहेत हे सिद्ध करा. सुप्रीम कोर्टाने क्लीन चिट दिली असेल तर दाखवा, असंही अनिल परब म्हणाले.
देवेंद्र फडणवीस नागपूर मनपाचे महापौर होते, त्यावेळी घोटाळा झाल्याचा आरोप शिवसेनेने केला होता. त्यावरुन फडणवीसांनी नंदलाल समितीच्या अहवालाचा दाखला दिला होता.
आशिष शेलार यांच्यावर टीकास्त्र
आशिष शेलार ज्या वॉर्डात राहतात, तो वॉर्ड सुद्धा जिंकणं त्यांच्यासाठी कठीण आहे, म्हणून ते टीका करत आहेत. आमदारांनी विधायक कामं करणं अपेक्षित असतं, मात्र त्यांना फक्त नंगानाच संस्कृतीच दिसते, असा हल्लाबोल अनिल परब यांनी केला.
मुंबईकरांच्या गरजा ओळखू शकले नाहीत, म्हणून आदित्य ठाकरेंच्या नाईट लाईफ प्रस्तावावर हीन दर्जाची टीका ते करत आहेत. केंद्राने नाईट लाईफला परवानगी दिली तेव्हा समर्थनात बोलत होते, म्हणजे आपलं ते बाब्या दुसऱ्याचं ते कार्ट, अशी यांची भावना आहे, असंही परब म्हणाले.
संबंधित बातम्या