Shivsena Eknath Shinde : शिवसेनेत फूट पडत असल्याची चर्चा जोरात सुरू असताना आता दुसरीकडे आणखी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. नॉट रिचेबल असणारे शिवसेना नेते एकनाथ शिंदे हे गुजरातमध्ये असल्याची माहिती समोर आली आहे. एकनाथ शिंदे यांना फोनवर संपर्क केल्यानंतर गुजराती भाषेतील टोन ऐकू येत आहे. त्यामुळे ते गुजरातमध्ये असल्याची चर्चा सुरू आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत काही आमदारही असल्याची माहिती आहे. 


विधान परिषद निवडणुकीनंतर शिवसेनेतील अंतर्गत धुसफूस बाहेर येत आहे.  शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय समजले जाणारे शिवसेना नेते एकनाथ शिंदे हे नाराज असल्याचे वृत्त होते. त्यातच आता त्यांचे समर्थक समजले जाणारे 13 आमदार नॉट रिचेबल असल्याची माहिती समोर आली होती. मध्यरात्री शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या आमदारांची बैठक बोलावली होती. या बैठकीत 13 आमदार अनुपस्थित होते. त्यानंतर शिवसेनेच्या गोटातील चिंता आणखी वाढली आहे. त्यानंतर आज मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी आज दुपारी शिवसेनेच्या आमदारांची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीला एकनाथ शिंदे हजर राहणार का? याकडे लक्ष लागलं आहे.


सोमवारी पार पडलेल्या विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेने आपले दोन्ही उमेदवार विजयी करण्यात यश मिळवले. मात्र, या निवडणुकीत काँग्रेससोबत शिवसेनेचेही मते फुटली असल्याची चर्चा सुरू आहे. आता फुटलेल्या मतांवरून आता शिवसेनेतच फूट पडतेय का, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. 


एकनाथ शिंदे घेणार टोकाची भूमिका?


गेले काही वर्ष नाराज असलेले शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे आणि त्याच्या गटाचे आमदार यांनी टोकाचं पाऊल उचललं आहे अशी माहिती समोर येत आहे. एकनाथ शिंदे यांचा नाराज गट काल सायंकाळपासूनच नॉट रिचेबल असल्याची माहिती  आहे. रात्रीच्या सुमारास 'एबीपी माझा'च्या प्रतिनिधींनी देखील काही आमदारांना फोन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनाही फोन नॉटरिचेबल लागला होता. शिवसेनेतली धुसफूस लक्षात येताच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी देखील 'वर्षा' या निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी चर्चा केली. 


इतर महत्त्वाच्या बातम्या: