Vidhan Parishad Election 2022 : एकीकडे शिवसेनेत (ShivSena) राजकीय भूकंप होण्याची चिन्हं असताना काँग्रेसमध्ये पहिल्या पसंतीच्या उमेदवाराच्या पराभवानं प्रचंड नाराजी आहे. यापुढे  महाविकास आघाडीत (Maha Vikas Aghadi) राहायचं का? याचा विचार करावा लागेल, असं निर्वाणीचं वक्तव्य काँग्रेसचे (Congress) माजी मंत्री आणि ज्येष्ठ नेते नसीम खान (Naseem Khan) यांनी केलं आहे. विधानपरिषदेतील पराभवानंतर महाविकास आघाडीतील मतभेद उघड झाले आहेत. काँग्रेसला महाविकास आघाडीत काय मिळतंय? याचा विचार करणं गरजेचं असल्याचं नसीम खान यांनी म्हटलं आहे. त्यामुळे काँग्रेस महाविकास आघाडीतून बाहेर पडणार का? याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगल्याचं पाहायला मिळत आहे. 


काँग्रेस नेत्यांची दिल्लीत धाव


पक्षातील नाराजीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे आमदार आज दिल्लीला जाणार आहेत. पहिल्या पसंतीचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांच्या पराभवानं काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आलेत. त्यानंतर काँग्रेसचे अनेक नेते आता दिल्लीत धाव घेण्याची शक्यता आहे. पक्षश्रेष्ठींना भेटून पक्षातील या घडामोडी त्यांच्या कानावर घालण्याचा प्रयत्न केला जाईल अशी शक्यता आहे. 


विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीला धक्का 


अत्यंत चुरशीनं रंगलेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकीमध्ये भाजपनं पुन्हा एकदा महाविकास आघाडीला कात्रजचा घाट दाखवला आहे. भाजपचे पाचवे उमेदवार प्रसाद लाड या निवडणुकीमध्ये विजयी झाले. तर काँग्रेसचे भाई जगताप विजयी झाले असून चंद्रकांत हंडोरे यांना पराभवाचा धक्का बसला. या निवडणुकीमध्ये काँग्रेसची तीन मतं फुटली असून त्यांना पहिल्या पसंतीची केवळ 41 मतं मिळाली आहे.  मतमोजणीच्या पहिल्या टप्प्यानंतर एकूण आठ उमेदवारांचा विजय झाला. त्यानंतर नवव्या आणि दहाव्या जागेसाठी भाजपचे प्रसाद लाड विरुद्ध काँग्रेसचे भाई जगताप आणि चंद्रकांत हंडोरे यांच्यात चुरस निर्माण झाली. शेवटी प्रसाद लाड यांनी चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव केला. त्याचसोबत पहिल्या फेरीत मागे असणारे काँग्रेसचे भाई जगताप यांनी विजयी पताका फडकावली. पहिल्या फेरीमध्ये रामराजे निंबाळकर आणि उमा खापरे यांच्या कोट्यातील प्रत्येकी एक मत बाद झाल्यानंतर पहिल्या पसंतीच्या मतासाठी 25.73 चा कोटा ठरवण्यात आला होता. त्यानंतर हा निकाल जाहीर करण्यात आला.


विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेची 12 मतं फुटली, भाजपला 27 मतं जास्त मिळाली


भाजपने विधानपरिषदेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीतील मतं फोडत आपले पाचही उमेदवार निवडून आणले. महत्त्वाचं म्हणजे या निवडणुकीमध्ये शिवसेना पक्षाची तीन तर सहयोगी अपक्षांची एकूण 12 मतं फुटली. काँग्रेसची दोन मतं फुटल्याने त्यांच्या एका उमेदवाराचा पराभव झालं. या निवडणुकीमध्ये भाजपला अतिरिक्त 27 मतं मिळाली. भाजपला चार उमेदवार निवडून येण्याची शाश्वती असतानाही देवेंद्र फडणवीसांच्या रणनीतीमुळे पाचही उमेदवार निवडून आले. शिवसेना पक्षाची तीन मतं फुटली, तर सहयोगी पक्षाची एकूण 12 मतं फुटली. राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपला 123 मतं मिळाली होती, आता या निवडणुकीमध्ये त्यांना 134 मतं मिळाली. त्यामुळे भाजपला अतिरिक्त 27 मतं मिळाली आणि त्यांचा पाचवा उमेदवार निवडून आला.


महत्त्वाच्या इतर बातम्या :