मुंबई : धार्मिक स्थळे उघडण्याच्या मुद्द्यावरुन शिवसेना नेते, राज्याचे मंत्री अब्दुल सत्तार आणि खासदार इम्तियाज जलील यांच्यात खडाखडी पाहायला मिळाली. दोघेही एबीपी माझाच्या 'प्रश्न महाराष्ट्राचे' या कार्यक्रमात बोलत होते. सरकारला जागं करण्यासाठी मी मंदिरं, मशिदी खुली करण्याची मागणी केली. लोकांना जागृत करण्यासाठी मी मंदिरं, मशिदी खुली करण्यासाठी आंदोलन केलं. एमआयएम पक्षाचा मुस्लीम खासदार मंदिरं खुली करण्याची भूमिका मांडतो, याचं स्वागत होईल असं मला वाटलं होतं. जात-धर्माचं अंतर कमी करण्याचा प्रयत्न केला. मात्र मला केलेला विरोध निंदनीय होता. मंदिरं, मशिदी उघडणे गरजेचं आहे. त्यामुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, असं इम्तियाज जलील यांनी म्हटलं.


इम्तियाज जलील हुशार नेते आहेत. मंदिरं उघण्याची भूमिक त्यांनी घेतली तेव्हा मला आश्चर्य वाटलं. जलील साहेब अशी भूमिका घेऊ लागल्याने मी एका मित्राला विचारले की मध्यवर्ती निवडणुका लागल्यात का? असा टोला अब्दुल सत्तार यांनी लगावला. एमआयएम आणि मंदिर यांचा संबंध नाही. त्यामुळे इम्तियाज जलील यांना एमआयएममध्ये ठेवलं नाही पाहिजे, त्यांना शिवसेनेत आणलं पाहिजे. ते शिवसेनेत आले तर त्यांना आम्ही राज्यसभेत पाठवू, असं अब्दुल सत्तार यांनी म्हटलं.
सरकार मंदिरं, मशिदी खुली करण्यासाठी हालचाली करत आहे. हे इम्तियाल जलील यांना कळलं म्हणून त्यांनी ही भूमिका घेतली, असा टोलाही सत्तार यांनी लगावला.