मुंबई : मुंबई महापालिकेच्या एल वॉर्डसाठी प्रभाग समिती निवडणुकीत शिवसेनेने मनसेला अप्रत्यक्ष पाठिंबा दिला आहे. शिवसेनेच्या उमेदवार प्रविणा मोडसकर यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने मनसेच्या दिलीप लांडे यांची प्रभाग समितीच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे.
मुंबईत प्रभाग समितीच्या निवडीसाठी शिवसेना-मनसे युती
खरंतर एल वॉर्डमध्ये शिवसेनेकडे एकूण सहा जणांचा पाठिंबा होता. परंतु बहुमत सिद्ध करण्यासाठी शिवसेनेला दोन सदस्यांची मदत घ्यावी लागणार होती. मात्र भाजपची मदत घेण्यापेक्षा शिवसेनेने थेट माघार घेऊन मनसेचे गटनेते दिलीप लांडेंना प्रभाग समितीचं अध्यक्षपद दिलं.
प्रभाग समितीच्या अध्यक्षपदासाठी शिवसेनेच्या प्रविणा मोडसकर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सईदा खान यांनी अर्ज दाखल केले होते. परंतु भाजपला धक्का देण्यासाठी शिवसेनेने संख्याबळ असूनही, अर्ज मागे घेऊन अप्रत्यक्षरित्या मनसेला मदत केली. शिवाय राष्ट्रवादीच्या सईदा खान यांनीही अर्ज मागे घेतल्याने अवघे तीन सदस्य असलेल्या मनसेच्या दिलीप लांडे यांची बिनविरोध निवड झाली आहे.
मुंबईतील 17 पैकी 8 प्रभाग समित्यांचा निकाल हाती, कुठे कोण विजयी?
दरम्यान पहिलं वर्ष मनसेच्या दिलीप लांडे अध्यक्ष असतील तर पुढच्या वर्षी शिवसेना उमेदवार असा फॉर्म्युला ठरला आहे.
दिलीप लांडे यांची प्रतिक्रिया
"मी निवडून येण्यासाठी मला सर्वच पक्षांनी मदत केली. त्यामुळे सध्या एल वॉर्डचं प्रभाग समिती अध्यक्षपद मनसेकडे आहे. पुढच्या वर्षीचे पुढच्या वर्षी बघू," अशी प्रतिक्रिया दिलीप लांडे यांनी दिली. "तसंच आजचा हा चमत्कार राज साहेबांच्या आशीर्वादाने झाला आहे. पुढील काळातही राजसाहेबांचे असेच चमत्कार बघायला मिळतील," असंही लांडे म्हणाले.