मुंबईत प्रभाग समितीच्या निवडीसाठी शिवसेना-मनसे युती
एबीपी माझा वेब टीम | 22 Mar 2017 11:15 AM (IST)
मुंबई : मुंबई महापालिकेच्या प्रभाग समिती अध्यक्षपदाच्या निवडीत एल वॉर्डमध्ये नवी समीकरणं उदयास येण्याची शक्यता आहे. कारण इथे भाजपला धक्का देण्यासाठी शिवसेनेने थेट मनसेला मदत करण्याची तयारी केली आहे. एल वॉर्डमध्ये शिवसेनेकडे एकूण सहा जणांचा पाठिंबा आहे. पण बहुमत सिद्ध करण्यासाठी शिवसेनेला दोन सदस्यांची मदत घ्यावी लागणार आहे. मात्र भाजपची मदत घेण्यापेक्षा शिवसेनेने थेट माघार घेऊन मनसेचे गटनेते दिलीप लांडेंना प्रभाग समितीचं अध्यक्षपद देण्याची तयारी सुरु केली आहे. मुंबईतील 17 पैकी 8 प्रभाग समित्यांचा निकाल हाती, कुठे कोण विजयी? त्यासंदर्भात दोन्ही पक्षांच्या स्थानिक नेत्यांमध्ये वाटाघाटीही सुरु आहेत. त्यामुळे या वाटाघाटी यशस्वी झाली, तर अवघे तीन सदस्य असणाऱ्या मनसेला एल वॉर्डच्या प्रभाग समितीचं अध्यक्षपद मिळणार आहे. पहिलं वर्ष मनसेच्या दिलीप लांडे अध्यक्ष असतील तर पुढच्या वर्षी शिवसेना उमेदवार असा फॉर्म्युला ठरला आहे.