Shivsena Dasara Melava Row : यावर्षीचा दसरा मेळावा (Dasara Melava) हा शिवाजी पार्कवरच (Shivaji Park Ground) घेण्यासाठी शिवसेनेचे (Shiv Sena) दोन्ही गट पूर्णपणे प्रयत्न करत असल्याचं पाहायला मिळत आहे. शिवाजी पार्क मध्येच दसरा मेळाव्याचा आवाज घुमला पाहिजे, यासाठी दोन्हीही गट आग्रही आहेत. शिंदेंची शिवसेना (Shinde Group) आणि शिवसेना ठाकरे गट (Thackeray Group) हे दोघेही मुंबई महापालिकेकडे (BMC) दिलेल्या अर्जावरच्या उत्तरावरची वाट बघत आहेत. मात्र, ही वाट बघत असताना शिवसेना शिंदे गटानं या दसरा मेळाव्यासाठी प्लॅन बी तयार केला आहे. 


दसरा मेळाव्यासाठी दोन्हीही शिवसेनेचे गट मैदानात उतरलेले असताना शिवाजी पार्क मैदान हे आमच्याच गटाला मिळावं, यासाठी दोन्ही गटांकडून पुन्हा एकदा संघर्ष पाहायला मिळू शकतो. दोन्ही गटांनी शिवाजी पार्क आपल्याला दसरा मेळाव्यासाठी मिळावा, यासाठी महिन्याभरापूर्वीच एक पत्र बीएमसी विभागीय कार्यालयाला पाठवलं आहे. आता याच पत्रावर निर्णय घेण्याआधी मुंबई महापालिका विधी विभागाचं मार्गदर्शन घेते आहे. मात्र, हा निर्णय घेण्यासाठी शिवसेना शिंदे गटानं दसरा मेळावा घेण्यासाठीचा प्लॅन बी तयार केला आहे.


मागील वेळीप्रमाणे जर दसरा मेळाव्यासाठी शिवसेना शिंदे गटाला शिवाजी पार्क मैदान मिळालं नाही, तरी यंदाच्या वर्षी दसरा मेळावा नेमका कुठे घ्यायचा? तर यासाठी बीकेसी मैदान आणि महालक्ष्मी रेस कोर्समधील मैदानाचा आधीच विचार केला गेला आहे. मागील वर्षी झालेल्या बीकेसी एमआरडीए मैदानावर विकास काम सुरू आहे. त्यामुळे तिथे यंदाच्या वर्षी सभा होऊ शकत नाही. त्याच्या जवळच असलेल्या आणखी एका बीकेसी मैदानाचा विचार जिथे याआधी महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा झाली होती, तिथेच आता शिवसेना शिंदे गट दसरा मेळाव्याच्या सभेसाठी केला जात आहे. मुंबई महापालिकेच्या भूमिकेकडे दोन्ही गट लक्ष ठेवून आहेत आणि त्यानंतर आपली पुढची रणनिती दसरा मेळाव्या संदर्भातील ठरवली जाईल, असंही सांगितलं. 


यंदाचा दसरा मेळावा हा आगामी लोकसभा विधानसभा मुंबई महापालिका निवडणुकांसाठी महत्त्वाचा असणार आहे. शिवसेना शिंदे गटाकडून सध्या सत्तेत असताना केलेल्या कामाचा लेखाजोखा समोर ठेवला जाऊ शकतो. शिवाय दसरा मेळावा म्हणजे, एक प्रकारे निवडणुकीच्या आधीच शक्ती प्रदर्शन दोन्ही गटांसाठी असेल, त्यामुळे राज्यातील आमदार खासदार कार्यकर्ते पदाधिकारी यांना मुंबईत येणं सोयीस्कर पडेल, अशा ठिकाणी शिवाजी पार्क सोडून दसरा मेळाव्याचा प्लॅन बी शिवसेना शिंदे गटाकडून आखला जात आहे. त्यासाठी हजारो कार्यकर्ते या दसरा मेळाव्यासाठी उपस्थित राहतील, त्या दृष्टिकोनातून बीकेसी मैदान आणि रेस कोर्समधील मैदानाची जागा याची चाचपणी केली जात आहे. 


दरम्यान, शिवाजी पार्क मैदान दसरा मेळाव्यासाठी कोणाला द्यायचं? याबाबतच्या मुंबई महापालिकेच्या निर्णयाची दोन्ही गट वाट पाहत आहेत. मात्र मुंबई महापालिकेनं ऐनवेळी निर्णय दिला आणि मैदान जर मिळालं नाही तर त्यासाठी मैदानाचा प्लॅन बी रेडी ठेवणं महत्त्वाचं आहे. त्यासाठीच हे नियोजन शिंदे यांच्या शिवसेनेकडून सुरू आहे. पण त्याआधी शिवाजी पार्कसाठीचा संघर्ष कितपत दोन गटांमध्ये होणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.