Shivsena Dasara Melava 2022 : दसरा मेळाव्यावरुन (Dasara Melava) राजकारण (Maharashtra Politics) चांगलंच तापल्याचं पाहायला मिळत आहे. याप्रकरणी शिवसेनेनं (Shivsena) आणि त्यानंतर शिंदे गटानं (CM Eknath Shinde) हायकोर्टात (Bombay High Court) धाव घेतली आहे. शिवसेनेच्या याचिकेवर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी पार पडणार आहे. शिवाजी पार्कवर (Shivaji Park) यंदाचा दसरा मेळावा होणार की नाही? झाला तर तो कोणाचा? उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाचा की, शिंदे गटाचा? या प्रश्नाचं उत्तर आज मुंबई उच्च न्यायालय देणार आहे. तर मुंबई महापालिका प्रशासनानं मुंबई पोलिसांनी कायदा सुव्यवस्थेच्या मुद्यावर बोट ठेवल्यानं यंदा कुणालाही परवावगी न देण्याची भूमिका घेतली आहे. मुंबई महापालिकेनं दोन्ही गटांना परवानगी नाकारली आहे. 


शिवसेनेतील अंतर्गत संघर्षाच्या पार्श्वभूमीवर शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी महापालिकेनं दोन्ही गटांना परवानगी नाकारली आहे. मुंबई महापालिकेनं परवानगी नाकारल्यानंतर आता शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्याचा फैसला आता हायकोर्टात होणार आहे. रितसर परवानगी मागूनही महापालिकेनं चालढकल केल्यानं शिवसेनेच्या ठाकरे गटानं हायकोर्टात धाव घेतल्यानंतर त्यांच्या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. महापालिका प्रशासनावर राज्य सरकारचा दबाव असल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे.  न्यायमूर्ती आर. डी. धानुका आणि न्यायमूर्ती कमल काथा यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे.


कालच्या सुनावणीत काय झालं? 


दसरा मेळाव्यासंदर्भात शिवसेनेच्या वतीनं दाखल करण्यात आलेल्या याचिकेवरील सुनावणी वकिलांच्या वतीनं आजपर्यंत तहकूब करण्यात आली. आज सकाळच्या सत्रात या याचिकेवर सुनावणी पार पडणार आहे. काल (गुरुवारी) मुंबी महापालिकेनं ठाकरे गट आणि शिंदे गट दोन्ही गटांना पत्र पाठवत शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी परवानगी नाकारली. त्यानंतर याचिकारकर्त्या शिवसेनेच्या वतीनं ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ आस्पी चिनॉय यांनी न्यायालयात याचिकेत सुधारणेसाठी वेळ मागितला. न्यायालयानं शिवसेनेची ही विनंती मान्य करत याप्रकरणावरील सुनावणी आजपर्यंत तहकूब केली. 


शिवसेनेच्या वतीनं न्यायालयात विनंती करण्यात आली की, "मुंबई महापालिकेच्या वतीनं दसरा मेळाव्याच्या परवानगीसाठी केलेल्या अर्जाला आज (गुरुवारी) उत्तर देण्यात आलं आहे. ज्यावेळी आम्ही उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती, तोपर्यंत विनंती अर्जाला महापालिकेकडून कोणतंही उत्तर मिळालेलं नव्हतं. पण आता कायदा आणि सुव्यवस्थेचं कारण देत मुंबई महापालिकेकडून आम्हाला दसरा मेळाव्यासाठी परवानगी नाकारण्यात आली आहे. त्यामुळे या पार्श्वभूमीवर आम्हाला दाखल करण्यात आलेल्या याचिकेत सुधारणा करण्याची परवानगी देण्यात यावी."