'आरक्षण आणि इतर काही मागण्यांसाठी मराठा समाज चवताळून रस्त्यावर उतरला आहे. लाखा-लाखांचे मोर्चे काढले गेले. आंदोलन शांततेत सुरु होतं, पण कोणी फारसं लक्ष दिलं नाही, व्यथा गांभीर्याने घेतल्या नाहीत. त्यामुळे ठोक मोर्चा निघाले.' असं उद्धव ठाकरे म्हणाले.
मराठा समाजाच्या आडून आंदोलनात काही समाजकंटकांनी हिंसा घडवली मात्र, त्याचं खापर मराठा समाजाच्या डोक्यावर फुटलं, त्यामुळे कारवाई होणार असेल तर न्यायाने व्हावी, अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली.
आपलं घर म्हणजे महाराष्ट्र पेटवणारा कोणीही शिवरायांचा मावळा नसेल. काही लोकांना हिंसा केली, मात्र निरपराध तरुण, तरुणी, माता, भगिनी यांची धरपकड सुरु आहे. पुरावे असतील तरच अटक करावी. गुन्हे मागे घेतले जातील असं सांगितलं होतं, पण तसे आदेश कुठल्याही पोलिस स्टेशनला दिले नाहीत, असं उद्धव ठाकरे म्हणाले.