मुंबई : दादरच्या शिवाजी पार्कवरील शिवसेनेच्या दसरा मेळाव्याचं विघ्न अखेर दूर झालं आहे. पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील परिसर असल्याने या भागात लाऊडस्पीकर वापरण्यास परवानगी नव्हती. मात्र शिवाजी पार्क पोलिसांनी शिवसेनेला आता लाऊडस्पीकरसाठी परवानगी दिली आहे


16 ऑगस्ट 2016 च्या उच्च न्यायालयाच्या निकालानुसार राज्यात सायलेंट झोनमध्ये लाऊडस्पीकर वापरण्यास बंदी आहे. त्यामुळे शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात लाऊडस्पीकर वापरण्यास परवानगी नव्हती. परंतु शिवसेनेच्या अड. अनिल परब आणि मिलिंद नार्वेकर यांनी आज सकाळी शिवाजी पार्क पोलिसांकडून लाऊडस्पीकरची परवानगी मिळवली. त्यामुळे शिवसेनेच्या दसरा मेळाव्याचा अखेरचा अडथळाही पार झाला आहे.

मात्र सायलेंट झोनमध्ये लाऊडस्पीकरला परवानगी मिळाल्याने, दरवर्षीप्रमाणे पर्यावरण आणि ध्वनी प्रदूषणाच्या  नियमांवरुन शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला विरोध करणारी, शिवाजी पार्कची रहिवासी संघटना, वेकॉम ग्रुपच्या भूमिकेकडे सगळ्यांचं लक्ष असेल.

दरम्यान, यंदाही वर्षी दादरच्या शिवाजी पार्कवर शिवसेनेचा दसरा मेळावा पार पडणार आहे. या मेळाव्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे. मराठा क्रांती मोर्चा, व्यंगचित्र वाद, मुंबई महापालिका निवडणुका, शिवसेना-भाजपमधील धुसफूस या मुद्द्यांवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे काय भाष्य करतात याची उत्सुकता आहे.