कल्याण: शिवसेनेत पैसे घेऊन पदं वाटली जात असून निष्ठावंत शिवसैनिकांना पक्षात आता किंमत उरली नसल्याचा आरोप उल्हासनगरमधल्या एका शिवसैनिकानं केला आहे. आपली नाराजी व्यक्त करण्यासाठी त्यानं शिवसेना नेत्यांना एक पत्र लिहिलं असून त्यात पुढच्या वेळी प्रचाराला येताना पाठीला तेल लावून या, असा सज्जड दमचं त्याने पत्रातून दिला आहे.
विलास मुकादम असं पत्र लिहिणाऱ्या शिवसैनिकाचं नाव असून ते १९८८ पासून शिवसेनेत कार्यरत आहेत. उल्हासनगर, मलंगगड आणि ग्रामीण परिसरात त्यांनी विद्यार्थी दशेपासून पक्षाचं काम केलंय. मात्र या काळात अनेकदा पदं देण्याची वेळ आली, की आपल्याला डावललं गेल्याचा त्यांचा आरोप आहे. आत्ताची शिवसेना ही बाळासाहेबांची शिवसेना राहिली नसून ज्यांच्याकडे पैसा आहे, ते एका रात्रीत जाऊन पदं, तिकीटं घेऊन येतात. पण तळागाळात काम करणाऱ्या, वडापाव खाऊन झेंडे लावणाऱ्या सर्वसामान्य शिवसैनिकाला मात्र आज पक्षात किंमत नसल्याची खंत मुकादम यांनी व्यक्त केली आहे.
याबाबत मुकादम यांनी शिवसेना कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांना त्यांनी एक खरमरीत पत्र लिहिलं असून त्यात पुढच्या वेळी निवडणुकीच्या प्रचारासाठी याल, तेव्हा पाठीला तेल लावून या, असा सज्जड दमही भरण्यात आला आहे. या सगळ्याबाबत गोपाळ लांडगे यांना विचारलं असता मुकादम हे गेल्या काही वर्षांपासून पक्षात सक्रिय नसल्याचं सांगत त्यांनी आपण त्यांच्याशी बोलू, असं सांगितलं. तर मुकादम आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी मात्र गोपाळ लांडगे यांनी गावात येऊन बघावं, असं आव्हान दिलंय. शिवसेनेत आजवर पदवाटपावरून अनेकदा वाद झाल्याचं समोर आलं आहे. मात्र अशाप्रकारे एखाद्या कार्यकर्त्यांनं चिडून लिहिलेलं पत्र पहिल्यांदाच समोर आलं असून या प्रकाराची सध्या कल्याण आणि उल्हासनगर परिसरात मोठी चर्चा आहे.
प्रचाराला येताना पाठीला तेल लावून या!, शिवसैनिकाचं शिवसेना नेत्यांना पत्र
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
30 Oct 2018 12:05 PM (IST)
शिवसेनेत पैसे घेऊन पदं वाटली जात असून निष्ठावंत शिवसैनिकांना पक्षात आता किंमत उरली नसल्याचा आरोप उल्हासनगरमधल्या एका शिवसैनिकानं केला आहे. आपली नाराजी व्यक्त करण्यासाठी त्यानं शिवसेना नेत्यांना एक पत्र लिहिलं असून त्यात पुढच्या वेळी प्रचाराला येताना पाठीला तेल लावून या, असा सज्जड दमचं त्याने पत्रातून दिला आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -