मुंबई : राज्यातील भाजप सरकारला उद्या म्हणजेच 31 ऑक्टोबरला चार वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने एबीपी माझातर्फे आज 'माझा महाराष्ट्र माझं व्हिजन' या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. यामध्ये राज्यकर्त्यांच्या चार वर्षातल्या कामगिरीचं मूल्यमापन केलं जाणार आहे.
या कार्यक्रमात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, परिवहन मंत्री दिवाकर रावते, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार उपस्थित राहणार आहेत. मुख्यमंत्र्यांसह हे नेते महाराष्ट्रासाठीचं त्याचं व्हिजन मांडतील.
याशिवाय माजी मंत्री जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, सुनील तटकरे आणि काँग्रेस नेते भाई जगताप यांच्यासह सिनेदिग्दर्शक नागराज मंजुळे यांची प्रमुख उपस्थिती असेल. राज्य सरकारच्या या चार वर्षात केलेल्या कामांचा आढावा या कार्यक्रमाच्या माध्यमातून घेतला जाणार आहे.
'माझा महाराष्ट्र माझं व्हिजन' हा कार्यक्रम आज दुपारी 2 वाजल्यापासून एबीपी माझावर पाहता येणार आहे. एबीपी माझाच्या अधिकृत यू-ट्यूब चॅनल, फेसबुक पेज, ट्विटर हॅण्डल आणि हॉटस्टारवर नेटीझन्सना हा कार्यक्रम लाईव्ह पाहता येणार आहे.