मुंबई : मंगळवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत पुन्हा एकदा शिवसेना आणि भाजपच्या मंत्र्यांमध्ये वाद झाला. हिंदू सणांवरच नियम का, असा सवाल विचारत सेनेने भाजप मंत्र्यांना धारेवर धरलं.
कुठलाही सण किंवा उत्सवासाठी देणगी जमा करायची असेल तर त्यासाठी धर्मदाय आयुक्तांची परवानगी घेणं आवश्यक आहे. महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियमात सुधारणा करण्यात आली आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय झाला आहे. मात्र या निर्णयाला शिवेसनेच्या मंत्र्यांनी आक्षेप घेतला आणि हिंदू सणांवरच नियम का असा सवाल उपस्थित केला.
शिवसेनेच्या प्रश्नानंतर भाजप थोडीशी मवाळ झाली आणि दहीहंडी उत्सवाला त्यातून वगळण्यात आलं. मात्र गणेशोत्सव, जयंती आणि पुण्यतिथीच्या कार्यक्रमाला निधी जमा करण्यासाठी धर्मदाय आयुक्तांची परवानगी घ्यावी लागेल.
या निर्णयामुळे निधीचा विनियोग योग्य प्रकारे होऊन गैरव्यवहाराला आळा बसण्याची आशा आहे. शिवाय बळजबरीनं होणाऱ्या निधी संकलनाला आळा बसेल.