मुंबई: युतीसंदर्भात चर्चा करण्यासाठी भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यामध्ये बैठकिला सुरूवात झाली आहे. दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी एकमेकांना तिळगूळ देऊन बैठकीला सुरूवात केली. त्यामुळं भाजप शिवसेनेमध्ये दिलजमाई होणार की युतीवर संक्रांत ओढवणार? याबद्दल बैठकीनंतर चित्र स्पष्ट होईल.

या बैठकीसाठी भाजपकडून मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार, शिक्षणमंत्री विनोद तावडे आणि गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता उपस्थित आहेत. तर शिवसेनेकडून वाटाघाटी कऱण्यासाठी उद्धव ठाकरे यांचे विश्वासू खासदार अनिल देसाई तसेच मुंबईच्या वॉर्डावॉर्डाची खबरबात असणारे अनिल परब आणि रविंद्र मिर्लेकर उपस्थित आहेत.

मंत्रालयानजीक भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या बंगल्यावर ही बैठक सुरु आहे. दरम्यान, या चर्चेत भाजप शिवसेनेसमोर किती जागेंचा प्रस्ताव ठेवणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.