कल्याण : मुंबईकरांचा मुंबई-दिल्ली प्रवास वेगाने करण्यासाठी नुकतीच मध्य रेल्वे मार्गावर पहिली राजधानी एक्सप्रेस सुरु करण्यात आली आहे. आज राजधानी एक्सप्रेस कल्याणमध्ये पोहोचताच तिचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. परंतु या स्वागत समारंभाच्या वेळी शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाचे नेते श्रेयवादासाठी कल्याण रेल्वेस्थानकात दाखल झाले होते. दोन्ही पक्षांचे नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये श्रेयवादाची लढाई यावेळी पहायला मिळाली.


आठवड्यातून दोन वेळा मुंबईहून सुटणारी राजधानी एक्सप्रेस दररोज सोडण्याची मागणी आपण रेल्वेमंत्रालयाकडे करणार असल्याचे शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांनी सांगितले. त्याचवेळी भाजप खासदार कपिल पाटील यांनीदेखील लोकांना हेच सांगितले. दोन्ही पक्षांचे खासदार येथे श्रेय लाटण्यासाठी लढत असल्याचे पहायला मिळाले.

तसेच शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे आणि भाजप खासदार कपिल पाटील यांनी मध्य रेल्वे मार्गावर राजधानी एक्सप्रेस सुरु व्हावी यासाठी रेल्वे मंत्रालयाकडे पाठपुरावा केला असल्याचे दोन्ही खासदार व त्यांचे कार्यकर्ते सांगत होते. दोघांमध्ये आणि त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये श्रेय लाटण्यासाठी स्पर्धा सुरु असल्याचे चित्र कल्याण स्थानकात पहायला मिळाले.

विशेष म्हणजे राजधानी एक्स्प्रेसच्या स्वागत समारंभाच्यावेळी केवळ श्रेय घेण्यासाठी कल्याण महापालिकेची महासभा तहकूब करुन शिवसेना व भाजप नगरसेवकांनी कल्याण रेल्वे स्थानकाकडे धाव घेतली होती. रेल्वे स्थानकावर शिवसेना व भाजपचे नेते व कार्यकर्ते आमने-सामने येऊन फक्त श्रेयवादासाठी घोषणाबाजी करत होते.

दरम्यान मध्य रेल्वे मार्गावरील पहिली राजधानी एक्सप्रेस आजपासून सुरू झाली. रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर हिरवा झेंडा दाखवल्यानंतर गाडी मुंबईहुन निघाली. त्यानंतर तासाभरात ही गाडी कल्याणमध्ये दाखल झाली. या गाडीचे सेना-भाजप कार्यकर्त्यांनी उत्साहात स्वागत केले.

कल्याणहून रेल्वेने दिल्लीला जाण्यासाठी किमान 24 तासांपेक्षा जास्त वेळ लागतो. काही गाड्यांना तब्बल 30 तासांहून अधिक वेळ जातो. या प्रवासादरम्यान प्रवाशांचे खूप हाल होतात. त्यामुळे वेळ वाचवण्यासाठी अनेक प्रवासी मुंबई सेंट्रलहून दिल्लीला जाणाऱ्या राजधानी एक्सप्रेसने प्रवास करतात. या प्रवाशांना कल्याणहून मुंबई सेंट्रलला पोहोचण्यासाठी किमान दोन तासांचा अवधी लागतो.

दर बुधवारी व शनिवारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरुन दुपारी 2 वाजून 50 मिनिटांनी राजधानी एक्सप्रेस सुटणार आहे. ती दुपारी 3 वाजून 36 मिनिटांनी कल्याणमध्ये पोहोचेल. तर दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजून 20 मिनिटांनी गाडी दिल्लीत पोहोचणार आहे.