मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. शरद पवार यांच्या सिल्वर ओक इथल्या निवासस्थानी अवघ्या दहा मिनिटं दोन्ही नेत्यांची भेट झाली. शरद पवारांची भेट घेतल्यानंतर संजय राऊत मातोश्रीला रवाना झाले. "ही नेहमीप्रमामे सदिच्छा भेट होती. परंतु राज्यातील अस्थिर स्थितीबाबत शरद पवारांनी चिंता व्यक्त केली," अशी माहिती संजय राऊत यांनी भेटीनंतर माध्यमांना दिली.


विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून 14 दिवस उलटले आहेत, मात्र सत्ता स्थापनेचा तिढा अद्यापही सुटलेला नाही. 9 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र विधानसभा विसर्जित होईल. त्यामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होण्याची शक्यता आहे. मात्र अजूनही शिवसेना आणि भाजप यांच्यातील चर्चा मुख्यमंत्रीपदावरुन अडली आहे. दोन्ही पक्षातील डेडलॉक अद्यापही कायम आहे. तर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात अशीही चर्चा रंगली आहे. त्याच पार्श्वभूमीवर संजय राऊत आणि शरद पवार यांची भेट महत्त्वाची आहे.

पवारांनी अस्थिर स्थितीवर शरद पवारांनी चिंता व्यक्त केली : राऊत
मी माननीय शरद पवारांना भेटलो. ही नेहमीप्रमाणे सदिच्छा भेट होती. शरद पवार आहे म्हटल्यावर महाराष्ट्राच्या परिस्थितीवर चर्चा होणारच. सध्याच्या अस्थिर स्थितीवर शरद पवारांनी चिंता व्यक्त केली. लवकरात लवकर सरकार स्थापन व्हावं. काँग्रेस आणि राष्ट्रवादीला जनतेने विरोधी पक्षात बसण्यासाठी मॅनडेट दिला आहे, ही त्यांची भूमिका ठाम आहे, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली.

शिवसेना मुख्यमंत्रीपदावर ठाम
मुख्यमंत्री शिवसेनेचाच व्हावा, या आपल्या मागणीवर शिवसेना ठाम असल्याचं आज पुन्हा दिसून आलं. राज्यभरात उद्धव आणि आदित्य ठाकरे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भेटत आहेत. मुख्यमंत्री शिवसेनेचाच बनवा, अशी मागणी शेतकरी वर्गाकडून होत असल्याचं संजय राऊतांनी सांगितलं. युती होण्याआधीच मुख्यमंत्रीपदाबाबत दोन्ही पक्षांमध्ये ठरलं होतं. त्यामुळे तोच प्रस्ताव आहे. यापेक्षा कुठलाही नवा प्रस्ताव पाठवला जाणार नाही किंवा प्रस्ताव येणारही नाही, असंही राऊतांनी स्पष्ट केलं आहे. राष्ट्रपती राजवट लागू झाल्यास तो राज्याच्या जनतेवर अन्याय असेल, असं म्हणत भाजपवर टीका केली आहे.