मुंबई : शिवस्मारकाच्या पायाभरणी कार्यक्रमाला जाताना अपघातग्रस्त झालेल्या स्पीडबोटची कागदपत्रं 'एबीपी माझा'च्या हाती आली आहेत. कागदपत्रांनुसार बोटीतून केवळ 16 प्रवासी आणि चार क्रूना जाण्याची परवानगी होती, मात्र प्रत्यक्षात 25 जणांसह बोट समुद्रात रवाना झाली.


स्पीड बोट निघण्यापूर्वी एकूण 35 जण बसले होते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. बोट सुटण्यापूर्वी एका बाजूला कलली होती. त्यामुळे पोलिसांनी 8-10 जणांना बळजबरीने बाहेर काढलं. पोलिसांसोबत त्यांची शाब्दिक चकमकही उडाली.

स्पीड बोटच्या परवान्याच्या अटींनुसार स्पीड बोटमध्ये 24 लाईफ जॅकेट आणि आठ लाईफ रिंग असणं अनिवार्य आहे. परंतु प्रत्यक्षदर्शींनी बोटीत केवळ 6 ते 8 लाईफ जॅकेट असल्याचा दावा केला आहे. बोटीत एकही लाईफ रिंग नसल्याचंही त्यांचं म्हणणं आहे. काही प्रवाशांनी मात्र बोटीत 20 लाईफ जॅकेट होते, मात्र आपल्याला दिले गेले नाहीत, असा दावा केला आहे.

बोटीच्या कॅप्टनचं नाव रुचित साखरकर असून तो रायगड जिल्ह्यातील मुरुडचा असल्याची माहिती आहे.  तर मंडणगडचा रहिवासी असलेला अकबर हुसेन महाडकर त्याचा मदतनीस होता. बोट वेस्ट कोस्ट मरीन मार्क सर्विसेस या कंपनीच्या मालकीची होती.

शिवस्मारक पायाभरणी अपघात

मुंबईजवळ अरबी समुद्रात आयोजित शिवस्मारकाच्या पायाभरणी कार्यक्रमाला गालबोट लागलं. कार्यक्रमाला जाणारी स्पीडबोट खडकावर आपटून बुडाल्यामुळे सिद्धेश पवार या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला.

शिवस्मारकाच्या पायाभरणी कार्यक्रमासाठी शिवसंग्रामच्या कार्यकर्त्यांनी भरलेली स्पीडबोट समुद्रात निघाली होती. शिवसंग्रामचा कार्यकर्ता असलेल्या मामासोबत सिद्धेश बोटीने निघाला होता. त्यावेळी बोट दीपस्तंभाच्या खडकावर आदळून अपघात झाला.

स्पीडबोट दुपारी सव्वाचार वाजताच्या सुमारास दीपस्तंभाच्या खडकावर आदळून अपघात झाला होता. त्यानंतर शिवस्मारकाच्या पायाभरणीसाठी आयोजित आजचा कार्यक्रम रद्द करण्यात आला.