मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिलेल्या अप्रत्यक्ष प्रस्तावानंतर आता शिवसेनेत संभ्रमावस्था झाली आहे. शिवसेना आणि काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी एकत्र आल्यास भाजपचा पाडाव करणं शक्य आहे, असं पवारांनी कालच्या राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात म्हटलं होतं.


मात्र आघाडी सोबत जाण्याबाबत शिवसेनेतल्या एका गटात कुजबुज सुरु आहे, तर हिंदुत्वाच्या मुद्यावरुन भाजपची साथ न सोडण्यावर दुसरा गट ठाम आहे.

याशिवाय स्वबळावर लढून शिवसेनेची ताकद आजमवण्याबाबत पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर काही नेत्यांचा दबाव आहे. म्हणजेच पवारांच्या कालच्या वक्तव्यानंतर शिवसेनेत तीन मतप्रवाह तयार झाले आहेत.

त्यामुळे आता उद्धव ठाकरे पक्षातील नेत्यांपासून विभाग प्रमुखांपर्यंत चर्चा करून, सामान्य शिवसैनिकांच्या मनात काय आहे, याची चाचपणी करणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

काँग्रेसची प्रतिक्रिया

दरम्यान, शरद पवारांच्या शिवसेना आणि आघाडीबाबतच्या वक्तव्यानंतर काँग्रेसने सावध भूमिका घेतली.

“शिवसेनेसोबतच्या आघाडीसाठी काँग्रेसचा कोणताही प्रस्ताव नाही. शिवसेना आणि काँग्रेसमध्ये वैचारिक मतभेद आहेत.शिवसेनेचा अजेंडा वेगळा आहे. धर्मनिरपेक्ष पक्षांना एकत्र आणलं पाहिजे. त्यामुळे त्याबाबत राष्ट्रीय पातळीवर चर्चा होईल. शरद पवार यांनी व्यक्त केलेले मत वैयक्तिक मत असेल. याबाबत सर्व प्रमुख एकत्र बसतील तेव्हा चर्चा होईल”, असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सांगितलं. 

शरद पवार नेमकं काय म्हणाले?

शिवसेना आणि आघाडीची मते एक झाली, तर आगामी काळात भाजपचा पाडाव करता येऊ शकतो, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला आहे. रविवारी पुण्यात झालेल्या राष्ट्रवादीच्या 19 व्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

अशा प्रकारचं विधान करुन त्यांनी अप्रत्यक्षपणे शिवसेनेला तिसऱ्या आघाडीमध्ये सामील होण्याचं आमंत्रणच दिलं.

संबंधित बातम्या

शिवसेना आणि आघाडी एकत्र आल्यास भाजपचा पाडाव : शरद पवार  

पवार साहेबांनी देशाचं राजकारण करावं, द्वेषाचं नाही : मुख्यमंत्री 

 … तर मोदी नव्हे प्रणव मुखर्जी एनडीएचे पंतप्रधानपदाचे उमेदवार?   

पेशवेकालीन पगडी राष्ट्रवादीतून हद्दपार, यापुढे फुले पगडीनेच स्वागत