Thane : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पाठवलेल्या एका प्रस्तावाला केंद्र सरकारनं मंजूरी दिली आहे. ठाणे खाडी क्षेत्राला रामसर स्थळाचा दर्जा प्रदान करण्यात आला आहे. केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्री भुपेंदर यादव यांच्याकडून ही घोषणा करण्यात आली आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून ठाणे खाडी क्षेत्राला रामसर स्थळाचा दर्जा मिळावा यासाठी केंद्राकडे प्रस्ताव पाठवला होता.
ठाणे खाडी क्षेत्रात फ्लेमिंगो अभयारण्य 16.905 चौरस किलोमीटर क्षेत्रावर आहे. रामसर दर्जामुळे पक्षी निरीक्षणासाठी देश विदेशातून पर्यटक आकर्षित होणार आहे. यामुळं पर्यावरण आणि पर्यटन वाढीस चालना मिळून स्थानिकांना रोजगार उपलब्ध होणार आहे.
रामसर स्थळाचा दर्जा मिळालेले मुंबईतील पहिलेच क्षेत्र
नांदूर मध्यमेश्वर, लोणारनंतर ठाणे खाडी क्षेत्र महाराष्ट्रातील तिसरे रामसर स्थळाचा दर्जा मिळालेले क्षेत्र, तर मुंबईतील पहिलेच क्षेत्र आहे. देशात आणखी 11 पाणथळ प्रदेशांचा रामसर स्थळांच्या यादीत समावेश, तामिळनाडू, ओडिशा, जम्मू आणि काश्मीर, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातील पाणथळ प्रदेशांचा समावेश आहे. तांपारा तलाव, हिराकुड जलाशय, अनसुपा तलाव, यशवंत सागर, चित्रागुडी पक्षी अभयारण्य, सुचिंद्रम थेरुर पाणथळ क्षेत्र, वाडुवूर पक्षी अभयारण्य, कांजिरंकुलम पक्षी अभयारण्य, ठाणे खाडी क्षेत्र, हायगम पाणथळ संवर्धन क्षेत्र, शालबुग पाणथळ हे संवर्धन क्षेत्र आहेत. भारतातील रामसर स्थळांची एकूण संख्या 75 वर गेली आहे.
ठाणे ही आशियातील सर्वात मोठी खाडी असून एकूण 6522.5 हेक्टर क्षेत्र यात येते, त्यापैकी 1690.5 हेक्टर ठाणे फ्लेमिंगो अभयारण्य म्हणून घोषित आहे, तर 4832 हेक्टर इको सेन्सिटिव्ह झोन म्हणून घोषित आहे, यात भारतातील 20 टक्के कांदळवनाच्या प्रजाती आहेत, ग्रेटर आणि लेसर फ्लेमिंगो सोबत असंख्य स्थलांतरित पक्षांच्या जाती इथे येतात, कांदळवनात आढळणारे विविध मासे, कीटक, फुलपाखरे इथे आढळतात. जर रामसर दर्जा मिळाल्याने संपूर्ण ठाणे कांदळवन त्यात येईल, या संपूर्ण प्रदेशाचे संरक्षण होईल, इथल्या पर्यावरणाचे संरक्षण होईल, या कांदळवनात आंतरराष्ट्रीय नियम लागू होतील.
'रामसर' म्हणजे काय?
तर, 1971 साली इराणमधील 'रामसर' शहरात 'रामसर परिषद' पार पडली. या परिषदेत जगातील महत्त्वपूर्ण पाणथळ जागांचे संवर्धन व त्यांच्या पर्यावरणपूरक वापराचे निर्णय घेण्यात आले. त्यासाठी कृती आराखडा तयार करण्यात आला. या आराखड्यानुसार प्रत्येक सहभागी राष्ट्राने आपल्या देशातील जागतिक दृष्टीने महत्त्वपूर्ण पाणथळ जागा शोधून त्यांना ‘रामसर स्थळ’ म्हणून घोषित करावे असे ठरले. यासाठी पाणथळ जागेच्या कक्षेत सरोवरे, नद्या, तलाव, दलदल, गवताळ पाणथळ मैदाने, खाड्या, समुद्रकिनारे, भातखाचरे, दलदलीचे प्रदेश आदी जागांचा करण्यात आला. भारताने 'रामसर' करारावर 1982 साली सही करून पाणथळींच्या संवर्धनाकरिता पाऊल उचलले. सध्या जगातील 2410 पाणथळींना 'रामसर' चा दर्जा प्राप्त आहे, तर गेल्या 35 वर्षांमध्ये भारतातील 27 पाणथळींना 'रामसर' स्थळाचा दर्जा मिळाला आहे.