Sanjay Raut : आपल्या शाब्दिक प्रहाराने विरोधकांना घायाळ करणारे  शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत हे सध्या पत्राचाळ घोटाळा प्रकरणी तुरुंगात आहेत. ईडी कोठडीतून त्यांची रवानगी न्यायलयीन कोठडीत करण्यात आली आहे. त्यामुळे अटकेपूर्वी  दिवसभर राजकीय धावपळीत व्यस्त असणारे संजय राऊत यांचा आर्थर रोड तुरुंगातील दिनक्रम समोर आला आहे. एबीपी माझाला सूत्रांनी याबाबत माहिती दिली आहे. 


संजय राऊत यांचा कैदी क्रमांक  8959 आहे. एबीपी माझाला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,  संजय राऊत यांना सुरक्षितेच्या कारणास्तव इतर सामान्य कैद्यांपासून दूर ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राऊत सध्या स्वतंत्र बराकीत आहेत. संजय राऊत हे तुरुंगातील ग्रंथालयाचा वापर करत आहेत.  ग्रंथालयातील वर्तमानपत्र, पुस्तके वाचण्यात आपला वेळ घालवत आहेत. याशिवाय टीव्हीवर बहुतांश वेळ ते बातम्या पाहण्यात ते व्यस्त असतात.  पत्रकार म्हणून लिहिण्याचा छंद असल्याने त्यांच्या मागणीनुसार त्यांना वही आणि पेनही पुरवले जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. संजय राऊत हे दिवसभरातील बराच वेळ लिखाणात व्यस्त असतात. सुरक्षेच्या कारणास्तव त्यांना इतर सामान्य कैद्यांपासून दूर ठेवण्यात आले असून त्यांच्या सुरक्षेची योग्य काळजी जेल अधिकारी घेत आहेत. 


संजय राऊत यांना न्यायलयाच्या आदेशानुसार घरचे जेवण दिले जात आहेत. संजय राऊत यांचे भाऊ शिवसेना आमदार सुनील राऊत यांनी शुक्रवारी त्यांची भेट घेतली होती. बुधवारी सुनिल राऊत यांनी संजय राऊत यांची तुरुंग अधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये भेटण्याची परवानगी मागितली होती. मात्र, त्यांना तशी परवानगी नाकारण्यात आली.


पत्राचाळ पुनर्विकास गैरव्यवहार प्रकरणी शिवसेना नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांना विशेष पीएमएलए न्यायालयाने 22 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. राऊत यांना औषधे आणि घरचे जेवण देण्याची परवानगी न्यायालयाने दिली आहे. त्यांची रवानगी आर्थर रोड जेलमध्ये करण्यात आली आहे. राऊत यांची ईडी कोठडी 8 ऑगस्टला संपली होती. राऊत यांच्या अतिरिक्त कोठडीची आवश्यकता नसल्याचे ईडीतर्फे विशेष न्यायालयाला सांगण्यात आले. त्यानंतर न्यायमूर्ती एम. जी. देशपांडे यांनी राऊत यांची प्रकृती विचारात घेत त्यांना 22 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.


संजय राऊत यांच्यावर ईडीने केलेले आरोप


शिवसेना खासदार संजय राऊत यांचा पत्राचाळ घोटाळ्याशी थेट संबंध असल्याचा आरोप ईडीने केला आहे. त्यांचे भाऊ प्रविण राऊत पत्राचाळ डेव्हलेपमेंट पाहत होते. त्यांना HDIL ग्रुपकडून 112 कोटी रुपये मिळाले. त्यातील 1 कोटी 6 लाख 44 हजार रुपये संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्या खात्यात पाठवले गेले. अलिबाग येथे याच पैशातून जमीन खरेदी करण्यात आली. राऊत परिवाराला पत्राचाळ आर्थिक गैरव्यवहारात थेट आर्थिक फायदा झाला आहे. या प्रकरणात ज्यांचं नाव सुरुवातीला समोर आलं होतं आणि ज्यांच्यावर कारवाई झाली होती ते प्रविण राऊत हे नावालाच होते, या प्रकरणातील खरे आरोपी संजय राऊत असल्याचा दावा ईडीने केला आहे.