Mumbai Water Cut:  मु्ंबईकरांना आता पाणी जपून वापरावे लागणार आहे. पुरेशा पावसाअभावी जलाशयांमध्ये पुरेसा पाणीसाठा नसल्याने महानगरपालिका प्रशासनाने (BMC) पाणी कपातीचा निर्णय घेतला आहे. एक जुलैपासून 10 टक्के पाणी कपात (Water Cut in Mumbai) होणार असल्याची माहिती मुंबई महापालिकेने दिली आहे. सर्व नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहनही महापालिकेने केले आहे. 


या वर्षी पावसाळ्यास उशीर झाला असून महाराष्‍ट्रात पावसाचे उशिरा आगमन झालेले आहे. यावर्षी पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी असण्‍याबाबततचा अंदाज वर्तवण्‍यात आला आहे. मुंबई महानगराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांमध्ये दमदार पावसाअभावी पुरेसा पाणीसाठा नाही. त्यामुळे शनिवार दिनांक 1 जुलै 2023 पासून संपूर्ण बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात 10 टक्के पाणी कपात लागू करण्यात येत असल्याचे मु्ंबई महापालिकेने सांगितले आहे. मुंबई महानगरपालिकेच्यावतीने ठाणे, भिवंडी-निजामपूर महानगरपालिका आणि इतर गावांना जो पाणीपुरवठा केला जातो, त्यात देखील ही 10 टक्के कपात लागू राहणार आहे.


यंदाचा पावसाळा सुरू होऊन देखील मुंबईला पाणीपुरवठा करणाऱया धरणांच्या क्षेत्रांमध्ये अत्यंत कमी पर्जन्यवृष्टी झाली आहे. जून महिन्यात मागील वर्षाच्या तुलनेत तीन टक्क्यांनी कमी पावसाची नोंद झाली आहे. संपूर्ण मुंबई महानगराला पाणीपुरवठा करण्यासाठी एकूण उपयुक्त जलसाठा 14 लाख 47 हजार 363 दशलक्ष लिटर इतका असावा लागतो. त्या तुलनेत आज सर्व सात जलाशयांमध्ये मिळून फक्त 99 हजार 164 दशलक्ष लिटर म्हणजे 6.85 टक्के एवढाच उपयुक्त जलसाठा शिल्लक असल्याची माहिती महापालिकेच्यावतीने देण्यात आली. 


दमदार पावसाअभावी हीच परिस्थिती यापुढेही सुरू राहिल्यास मुंबईच्या पाणीपुरवठ्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. ही बाब लक्षात घेता, दमदार पाऊस होऊन मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांमध्ये उपयुक्त जलसाठ्याची स्थिती सुधारेपर्यंत, मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये शनिवार दिनांक 1 जुलै 2023 पासून दहा टक्के पाणी कपात लागू करण्यात येणार आहे. महानगरपालिकेच्या वतीने ठाणे, भिवंडी महानगरपालिका आणि इतर गावांना जेवढा पाणीपुरवठा केला जातो, त्यामध्ये देखील ही १० टक्के कपात लागू राहणार असल्याची नोंद घेण्याचे आवाहन पालिकेने केले आहे. पावसाअभावी निर्माण झालेली परिस्थिती पाहता दैनंदिन पाणी वापर काटकसरीने आणि काळजीपूर्वक करावा आणि महानगरपालिका प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. 


सात तलावांतून मुंबईला पाणीपुरवठा 


मुंबईला अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार व तुळशी या सात तलावांमधून दररोज 3,850 दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा केला जातो. पाऊस लांबल्याने तलावातील पाणीसाठा कमी झाला असून तळ गाठला आहे. त्यामुळे आता पाणी कपातीचा निर्णय घेण्यात आला आहे.