मुंबई : नागपूरमध्ये कालपासून सुरु पावसामुळे इतिहासात पहिल्यांदाच वीज गेल्याने विधीमंडळाचं कामकाज दिवसभरासाठी स्थगित झाले. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेने आपले मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून टीकास्त्र सोडले.
“एरवी पावसामुळे मुंबईच्या केवळ सखल भागात वीतभर पाणी साचले तरी ‘मुंबई बुडाली होSS’ असा बेंबीच्या देठापासून कंठशोष करणारे वाचाळवीर आता कुठे आहेत?” असा सवाल सामनातून विचारण्यात आलाय. तर कंठशोष करणाऱ्या वाचाळवीरांना कंठसुधारक वटी नेऊन द्यायला हवी अशी कोपरखळीही लगावली.
“मुंबई महापालिका आणि शिवसेनेविरुद्ध कोणी कितीही ठणाणा करू देत, पण काही तासांच्या पावसात नागपूर का बुडाले? कोणामुळे बुडाले? विधिमंडळाचे अधिवेशन स्थगित करण्याची इतकी नाचक्की का ओढवली, यावर मात्र आम्हाला काहीही म्हणायचे नाही” अशा तिरकस शब्दांत सामनाने कालच्या नागपुरातल्या स्थितीवर भाष्य करत भाजपला टोला लगावला आहे.
“नागपुरातील मुसळधार पावसामुळे विधान भवनातच पाणी शिरल्याने विधिमंडळाचे अधिवेशन दिवसभरासाठी स्थगित करण्याची भयंकर नामुष्की सरकारवर ओढवली.
दस्तुरखुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कर्मभूमी असलेले नागपूर काही तासांच्या पावसाने जलमय झाले. आपल्या डोळ्यासमोर शहरात पाणी भरते आहे, रस्त्यांचे रूपांतर नद्यांमध्ये होत आहे, हे पाहून मुख्यमंत्रीही नक्कीच व्यथित झाले असणार” अशा सामनातून शिवसेनेने थेट मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.
तर ‘विकास पुरुष’ म्हणून ओळख असलेल्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरींवरही टीका केली. “आपल्या लाडक्या शहराची आज जी अवस्था झाली ती बघून धडाकेबाज गडकरींनाही निःसंशय वेदना झाल्या असणारच” असे सामनात म्हटले आहे.
‘मुंबई बुडाली होSS’ म्हणणाऱ्यांची नागपुरात नाचक्की – सामना
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
07 Jul 2018 09:30 AM (IST)
“एरवी पावसामुळे मुंबईच्या केवळ सखल भागात वीतभर पाणी साचले तरी ‘मुंबई बुडाली होSS’ असा बेंबीच्या देठापासून कंठशोष करणारे वाचाळवीर आता कुठे आहेत?” असा सवाल सामनातून विचारण्यात आलाय. तर कंठशोष करणाऱ्या वाचाळवीरांना कंठसुधारक वटी नेऊन द्यायला हवी अशी कोपरखळीही लगावली.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -