मी छोटा आहे, त्यांचे पाय धरेन : जानकर
"एकत्र राहण्यासाठी जसं मुख्यमंत्री महोदयांना विनंती करु शकतो, तसं उद्धव ठाकरेंचे देखील पाय धरु शकतो. शिवसेना-भाजप एकत्र राहावी ही रासपची पहिल्यापासूनची भूमिका आहे आणि मी उद्धवसाहेबांचेही पाय धरायला जाणार आहे. आम्हा भावाभावांमध्ये कितीही भांडणं झाली, तरी दुसऱ्याच्या परड्यात ओतणार नाही, आमच्याच आळीत कसं टाकलं जाईल, याचा प्रयत्न करु. शिवसेना, भाजप, आरपीआय, शिवसंग्राम, रासप आणि शेतकरी संघटना, आम्ही कसं एकत्र राहायचं, यासाठी आम्ही प्रयत्न करु. यासाठी मी प्रयत्न करेन, मी विनंती करेन, मी पाय धरेन. कारण मी यांच्यापेक्षा छोटा आहे. पक्षही छोटा आहे, वय पण छोटं आहे," असं जानकर म्हणाले.
जानकरांनी दानवेंचे पाय धरले!
नागपूरमध्ये विधानपरिषद निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्यापूर्वी महादेव जानकरांनी काल भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे पाय धरले. जानकरांनी रासपच्या तिकीटावर निवडणूक लढवण्याचा हट्ट धरला होता. त्यांचा हट्ट भाजपने अखेर पूर्ण केला. हा प्रसंग कॅमेऱ्यात कैद झाल्यानंतर त्याची चर्चाही रंगली होती. त्याविषयी बोलताना जानकर म्हणाले की, "मी नेहमीच दानवे, गडकरी यांचे पाय धरतो. मुंडेंचेही पाय धरायचो. ही आपली संस्कृती आहे."
16 जुलैला निवडणूक
एकूण 11 विधानपरिषद आमदार यावेळी निवृत्त होणार असून 27 जुलै 2018 रोजी त्यांचा कार्यकाळ संपणार आहे. 16 जुलैला या जागांसाठी निवडणूक होणार आहे. 5 जुलैला उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख असून 9 जुलैपर्यंत उमेदवारी मागे घेता येईल. त्यामध्ये राष्ट्रवादीच्या चार, काँग्रेसच्या तीन, भाजपचा एक, शिवसेना, रासप आणि शेकापच्या प्रत्येकी एका आमदाराचा समावेश आहे.