Dombivali News : डोंबिवलीमधील शिवसेना (Shiv Sena) शहर शाखेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचा फोटो लावण्यावरून ठाकरे गट आणि शिंदे गटात जोरदार राडा झाला. यावेळी दोन्ही गट आक्रमक झाले होते. या प्रकरणी डोंबिवली शिवसेना पदाधिकारी कविता गावंड यांच्या विरोधात डोंबिवली राम नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांसदर्भात अपशब्द वापरल्याचा आरोप गावंड यांच्यावर आहे.


डोंबिवलीत शिवसेनेच्या मध्यवर्ती शाखेत मंगळवारी दुपारी ठाकरे गट आणि शिंदे गटात जोरदार राडा झाला. शाखेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांचा फोटो काढण्यात आला होता. काल दुपारच्या सुमारास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांचे फोटो पुन्हा लावण्यासाठी शिंदे गटातील कार्यकर्ते शाखेत गेले होते. फोटो लावताना दोन्ही गटात जोरदार राडा झाला. दोन्ही गटातील कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी एकमेकांना धक्काबुक्की देखील करण्यात आली होती. पोलिसांनी घटना स्थळी धाव घेत परिस्थीत नियंत्रणात आणली. यामुळे शाखेला पोलीस छावणीचं स्वरूप प्राप्त झाले होतं. शिंदे गटातील योगेश जुईकर यांच्या तक्रारीनंतर राम नगर पोलिसांनी शिवसेनेच्या महिला पदाधिकारी कविता गावंड यांच्या विरोधात भादवी 153 अ आणि 505 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


नेमकं प्रकरण काय?


डोंबिवलीच्या शिवसेनेच्या शाखेतील भिंतीवरती आनंद दिघे यांच्यासह शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो लावण्यात आला आहे. त्यांच्या बाजूला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र आणि शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांचा फोटो लावण्यात आला आहे. या फोटोंमध्ये शिंदेंच्या समर्थकांनी एकनाथ शिंदे यांचा फोटो लावत होते. हे पाहताच शिंदे समर्थक आणि शिवसैनिक यांच्यात राडा झाला. काही वेळ कार्यकर्त्यांमध्ये हमरातुमरीही झाल्याची माहिती मिळत आहे. 


दरम्यान, शिवसेनेतील प्रबळ नेते एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंड करत भाजपसोबत हातमिळवणी करुन सरकार स्थापन केलं. शिवसेनेतील बंडाळीनंतर शिवसेनेत दोन गट पडले आहेत. एक शिंदे गट आणि दुसरा ठाकरे गट. अनेकदा यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसून आल्या आहेत. तसेच, राज्यांतील अनेक भागांत शिवसैनिक आणि शिंदे गट यांच्यात संघर्ष झाल्याचंही पाहायला मिळालं आहे. अशातच काल डोंबिवलीत झालेला संघर्ष आता आणखी वाढण्याची चिंताही व्यक्त केली जात आहे.