मुंबई : मुंबईत शनिवारची(17 जुलैच्या) रात्र पावसामुळं काळरात्र ठरली आहे. चेंबूर, विक्रोळी आणि भांडूपमध्ये झालेल्या तीन दुर्घटनांमध्ये 30 जणांना मृत्यू झाला आहे. चेंबूरमध्ये दरड कोसळून 19 जणांचा मृत्यू झाला आहे. तर विक्रोळीत झोपडपट्टी कोसळून 10 जणांचा मृत्यू झाला आहे. तर भांडूपमध्येही भिंत कोसळून 16 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला आहे.


या घटनेनंतर विरोधकांकडून मुंबई महापालिकेवर टीकेची झोड उठवण्यात आली. यानंतर आज सामनाच्या अग्रलेखातून शिवसेनेने टीका करणाऱ्यांना उत्तर दिलं आहे. शनिवारच्या मध्यरात्री मुंबईत दुर्घटनांची ‘दरड’ कोसळली ती अनैसर्गिक पावसामुळेच. मुंबईत पावसाने काही झाले की मुंबई महापालिकेच्या नावाने बोटे मोडणाऱ्यांनी हे लक्षात घेतले पाहिजे, असं म्हणत आजच्या सामना अग्रलेखातून म्हटलं आहे. पावसाळ्यापूर्वी आणि प्रत्यक्ष मुसळधार पाऊस कोसळतो तेव्हा प्रशासनातर्फे आवश्यक खबरदारी घेतली जात असते. तरीही कधीकधी ‘अनैसर्गिक’ पावसाचा ‘दगाफटका’ होतो, असंही अग्रलेखात म्हटलंय.


तर शनिवारी रात्री 11 ते पहाटे 3 या केवळ चार तासांत सर्वाधिक पाऊस कोसळला. एवढय़ा कमी वेळात प्रचंड पाऊस कोसळल्याने चेंबूर आणि विक्रोळीतील दुर्घटना घडल्या हे उघड आहे. प्रचंड पाऊस आणि पाण्याचा रेटा यामुळे दरड खचली. संरक्षक भिंती कोसळल्या, असंही अग्रलेखात म्हटलं आहे.


चेंबूर, विक्रोळी दुर्घटनेवर मुख्यमंत्र्यांकडून शोक, मृतांच्या वारसांना प्रत्येकी 5 लाखांची मदत


मुंबईत शनिवारची रात्र पावसामुळं काळरात्र ठरली. चेंबूर, विक्रोळी आणि भांडूपमध्ये झालेल्या तीन दुर्घटनांमध्ये 30 जणांना मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत झालेल्या मृत्यूसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोक व्यक्त केला आहे. तर मृतांच्या वारसांना शासनाकडून प्रत्येकी 5 लाख रुपये देण्याचे आणि जखमींवर मोफत उपचार केले जातील असेही  त्यांनी जाहीर केले आहे. तसेच मुंबईतील मिठी नदी आणि इतर मोठ्या नाल्यांलगत पाणी वाढल्यास आसपास राहणाऱ्या रहिवाशांना मोठ्या प्रमाणावर त्रास होऊ शकतो हे पाहून त्यांना प्रसंगी स्थलांतरित करावे अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.


पंतप्रधानांकडून शोक व्यक्त, मृतांच्या परिवाराला मदतीची घोषणा


दरम्यान, मुंबईत भिंत कोसळून मृत झालेल्या व्यक्तिंच्या परिवाराला प्रत्येकी दोन लाख रुपयांच्या मदतीची घोषणा पंतप्रधान कार्यालयाकडून करण्यात आली आहे. तर या घटनांमधील जखमींना 50 हजार रुपयांची घोषणा करण्यात आली आहे.  पंतप्रधान मदत निधीतून मदत देणार असल्याची घोषणा पंतप्रधान मोदींनी केली आहे. या घटनेबद्दल पंतप्रधान मोदींसह गृहमंत्री अमित शाह यांनी शोक व्यक्त केला आहे.  मुंबईतील चेंबूर आणि विक्रोळी येथे भिंत कोसळल्याने झालेल्या जीवितहानीची घटना पाहून व्यथित झालो आहे. या दुर्घटनेतील मृतांच्या परिवारासोबत माझ्या संवेदना प्रकट करत आहे. जखमी झालेल्या व्यक्तिंच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधार व्हावा ही प्रार्थना करतो, असं पंतप्रधान मोदींनी म्हटलं आहे.