मुंबई : राष्ट्रवादीचे नेते आणि मविआ सरकारमधील मंत्री हसन मुश्रीफ यांच्या तथाकथित घोटाळ्याची आणि त्यांनी जमवलेल्या संपत्तीची माहिती देण्यासाठी भाजप नेते किरीट सोमय्या आज कोल्हापूरला पोहोचणार होते. पण त्यापूर्वीच ज्यांच्याकडे गृहविभाग आहे त्याच राष्ट्रवादीने किरीट सोमय्यांना रोखून धरण्याचा प्रयत्न केला. यावरून भाजपने चांगलेच रान उठवले. मात्र यात शिवसेना बदनाम होत असल्याचे पाहून शिवसेनेने या पोलीसी कारवाईत आमचा काहीही हात नसल्याचे सांगत हात वर केले आहेत आणि सर्व जबाबदारी राष्ट्रवादीवर फोडून मोकळे झाले आहेत. यावरून मविआ सरकारमध्ये विशेषतः शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये आलबेल नसल्याचे चित्र समोर येत आहे.


किरीट सोमय्यांवरील कारवाई मुख्यमंत्री कार्यालयाची नाही तर गृह मंत्रालयाची, शिवसेनेचं स्पष्टीकरण


अर्थात याची सुरुवात राज्यात मविआ सरकार आलं तेव्हाच झाली होती. खरे तर शिवसेना खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यामुळेच राज्यात महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार स्थापन होऊ शकले. नेहमीप्रमाणेच शरद पवार यांनाच राष्ट्रवादीकडे गृहमंत्रीपद असावे असे वाटत असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गृहमंत्रीपद राष्ट्रवादीला दिले. शरद पवार यांनी गृहमंत्रीपदी अनिल देशमुख यांची नेमणूक केली. त्यानंतर गृहमंत्रालयाने काय काय दिवे लावले ते सगळ्यांसमोर आहेत. बीअर बार मालकांकडून खंडणी वसूल करण्यापासून ते अँटिलियासमोर स्फोटके ठेवण्यापर्यंत गृहमंत्रालयाचे अधिकारी लिप्त असल्याचे समोर आले. भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळेच अनिल देशमुख यांना बाहेर बसावे लागले आणि आता तर ते अनेक महिने फरार आहेत. ते कुठे आहेत याचा कोणालाही पत्ता नाही. मात्र या सगळ्या प्रकरणात शिवसेना मात्र फुकाची बदनाम झाली. गृहविभागाच्या घोटाळ्यात मुख्यमंत्र्यांचा हात असल्याचे म्हटले जाऊ लागले होते.


Kirit Somaiya : घोटाळे उघडकीस आणणाऱ्याला अटक करणाऱ्या ठाकरे सरकारचा उद्धटपणा आम्ही चालून देणार नाही : किरीट सोमय्या


भाजप नेते किरीट सोमय्या यांनी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यानंतर मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले. याबाबतची कागदपत्रेही त्यांनी ईडीला दिली आहेत. खरे तर हसन मुश्रीफ यांनी किरीट सोमय्यांच्या आरोपानंतर लगेचच पत्रकार परिषद घेऊन किरीट सोमय्यांच्या आरोपात तथ्य नसल्याचे म्हटले होते. असे असताना काल जेव्हा किरीट सोमय्यांनी कराडच्या दौऱ्याची आखणी केली तेव्हा लगेचच राष्ट्रवादीकडे असलेल्या गृहमंत्रालयाने कारवाईस सुरुवात केली. खरे तर हसन मुश्रीफ यांनी खुलासे केल्यानंतर किरीट सोमय्या यांना जाऊ द्यायला पाहिजे होते पण तसे न करता त्यांना स्थानबद्ध करण्याचा प्रयत्न केला. मात्र या सगळ्या प्रकरणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे संशयाची सुई गेली आणि भाजपने मुख्यमंत्र्यांना टार्गेट करण्यास सुरुवात केली. हे पाहून लगेचच शिवसेनेने स्पष्टीकरण देण्यास सुरुवात केली.


शिवसेनेच्या एका वरिष्ठ नेत्याने एबीपी माझाशी बोलताना सांगितले, किरीट सोमय्यांवरील कारवाईशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा किंवा मुख्यमंत्री कार्यालयाचा काहीही संबंध नाही. अशी कारवाई केली जाणार आहे याची मुख्यमंत्र्यांना कल्पना नव्हती आणि मुख्यमंत्र्यांची परवानगीही घेतली नव्हती असेही या नेत्याने सांगत शिवसेनेची बाजू सावरून राष्ट्रवादीला टार्गेट केले. दुसरीकडे खासदार संजय राऊत यांनीही गृहमंत्रालयाने कारवाई केली असून मुख्यमंत्र्यांचा संबंध नसल्याचे स्पष्ट केले. भाजप खासदार आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेवर विशेषतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत वक्तव्य केले आणि लगेचच मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्री आणि पोलीस अधिकाऱ्यांसोबत वर्षावर बैठक घेऊन नारायण राणेंना अटक करण्यास परवानगी दिली होती. यावेळी मात्र तसे झाले नाही असे शिवसेना नेत्यांचे म्हणणे आहे.


काही दिवसांपासून सिवसेना आणि राष्ट्रवादीत आलबेल नाही. शरद पवार यांनी संजय राऊत यांच्या कोथळा काढण्याच्या वक्तव्यावर चांगलीच टीका केली होती. दुसरीकडे राज्यभरात शिवसेनेच्या अनेक नेते आणि कार्यकर्त्यांना फोडून राष्ट्रवादीत आणलं जात आहे. काँग्रेसही शिवसेनेला फोडण्याचा प्रयत्न करीत आहे. किरीट सोमय्या प्रकरणाने राष्ट्रवादी आणि शिवसेनेत दूरी वाढू लागल्याचे दिसत आहे. मात्र या सगळ्यामुळे काँग्रेस मात्र आनंदात आहे. या दोघांचे नुकसान झाले तर त्याचा फायदा काँग्रेसला होईल असा विश्वास काँग्रेसला वाटत आहे. तसंही संजय राऊत यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी माझाशी बोलताना म्हटलंच होतं, राजकारणात एक दरवाजा नेहमी किलकिला ठेवायचा असतो.