Shiv Sena MP Sanjay Raut PC : उत्तर प्रदेशात सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचं पालन करण्यात आलेलं आहे, असं म्हणत संजय राऊतांनी राज ठाकरेंनी योगी आदित्यनाथांचं कौतुक केल्याप्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच, राज ठाकरे यांचं मतपरिवर्तन हा पीएचडीचा विषय असल्याचं संजय राऊत म्हणाले आहेत. तसेच, राणा दाम्पत्य आणि पंतप्रधान मोदींवरही संजय राऊतांनी टीकास्त्र डागलं आहे.
शिवसेना खासदार संजय राऊत बोलताना म्हणाले की, "उत्तर प्रदेशात भोंगे उतरवण्यात आलेले नाहीत. तिथे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचं पालन करण्यात आलेलं आहे. अशाच प्रकारचं पालन महाराष्ट्रातही करावं, अशीच सरकारची भूमिका आहे. महाराष्ट्र सरकार नेहमीच न्यायालयाच्या आदेशाचं पालन करतं, त्यामुळे हा भोंग्यांचा विषय आहे, तो राजकीय वातावरण तापण्याचा प्रयत्न सुरु आहे. ही भोंगेबाजी. आता योगी कोण? भोगी कोण? आणि हे योगी आणि भोगी संदर्भातील मतपरिवर्तन कसं झालं? हा संशोधनाचा विषय आहे. जर एखाद्या विद्यार्थ्याला यावर पीएचडी करायची असेल, तर ती त्यांनी करायला हवी. फार इंटरेस्टिंग विषय आहे हा."
"राज्यातील सर्व विरोधी पक्षांच्या नेत्यांसोबत गृहमंत्र्यांची बैठक झाली होती. पण राज्यातील सर्वात मोठा विरोधी पक्ष असलेल्या भाजपनं या बैठकीवर बहिष्कार घातला होता. याचाच अर्थ की, तुम्हाला राजकारण करायचंय. तुम्हाला भोंग्यां मुद्द्यावरुन राज्यात अशांतता पसरवायची आहे. यावरुन लोकांमध्ये संभ्रम निर्माण करायचा आहे. तसेच, आम्ही असंही सांगितलं होतं की, भोंग्यांच्या मुद्द्यावरुन देशात एक धोरण लागू करणं गरजेचं आहे. जे संपूर्ण देशात लागू होईल. योगी सरकारचा निर्णयही अत्यंत महत्त्वपूर्ण आहे.", असं संजय राऊत म्हणाले.
सामना अग्रलेखातून आज पंतप्रधान मोदींवर टीका करण्यात आली आहे. त्यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, "पंतप्रधानांना लक्ष्य केलं असं म्हणता येणार नाही, जी भूमिका स्पष्ट करायची आहे, ते आम्ही मांडली. ज्या राज्यात त्यांचे मुख्यमंत्री नाही, त्याच राज्यांवर त्यांनी परवाच्या बैठकीमध्ये ज्या प्रकारची टीका केली. प्रधानमंत्री म्हणून त्यांच्याकडून ही अपेक्षा नाही. देशाचे पंतप्रधान संपूर्ण देशाचे असतात. ज्या राज्यात त्यांच्या पक्षाचं सरकार नाही, त्या राज्यांबाबत पंतप्रधान यांनी जास्त संवेदनशील असायला हवं. याला आपण लोकशाही म्हणतो. मात्र दुर्दैवानं महाराष्ट्र, राजस्थान, छत्तीसगड अशा राज्यांना सावत्रपणाची वागणूक मिळत आहे. त्यांची आर्थिक कोंडी केली जाते. म्हणून उद्धव ठाकरे वारंवार आवाज उठवत असतात आणि त्याचेच प्रतिबिंब आज अग्रलेखात दिसून आलं.", असं संजय राऊतांनी सांगितलं.