Sanjay Raut on Jay Bhim: कायद्यास आणि न्याय व्यवस्थेसही जातीची, धर्माची वाळवी लागली पण 'जय भीम' म्हणतो, घटनेचे खांब मजबूत आहेत, चिंता नसावी असे शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी म्हटले. एका चंद्रू वकिलाने सत्य आणि कायद्याची ताकद दाखवली. पण फादर स्टॅन स्वामी तुरुंगात मारले गेले. सुधा भारद्वाज, वरवरा राव, गौतम नवलाखांसारखे अनेक चंद्रू तुरुंगात खितपत पडले आहेत. जय भीम कोणाला म्हणावे असा प्रश्न शिवसेना खासदार संजय राऊत यांनी विचारला आहे. 


संजय राऊत यांनी शिवसेनेचे मुखपत्र 'सामना'मधील 'रोखठोक' या सदरात 'जय भीम' (Jai Bhim movie) चित्रपटाच्या अनुषंगाने देशातील परिस्थितीवर भाष्य केले आहे. स्वातंत्र्याच्या सूर्याची किरणे देशातील असंख्य दलित, आदिवासींपर्यंत पोहोचलीच नाहीत. 'जय भीम' हा चित्रपट तामिळसह पाच भाषांतून पडद्यावर झळकला आहे. त्यात स्वातंत्र्याची किरणे न पाहिलेल्या वर्गाची सत्यकथा आहे. जय भीममधील सत्यकथन इतके प्रभावी आहे की, तो कोणत्याही भाषेत असला तरी देशातील शोषित-पीडितांची खरी गोष्ट असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले. जय भीम म्हणजे काय, तर कायद्याचा विजय. तो आजही होतो असे नाही. त्यासाठी अंतापर्यंत लढण्याची तयारी हवी व लढणारा एक चंद्रू हवा असेही राऊत यांनी लेखात म्हटले. 


संजय राऊत यांनी राजकन्नू आणि सेनगाई दांपत्याची मन सुन्न करणारी कथा चित्रपटात असल्याचे सांगत असे असंख्य राजकन्नू मारले जात आहेत. 'चंद्रू' बनून लढणारे फादर स्टॅन स्वामी, सुधा भारद्वाज लढता लढता शहीद होत आहेत. सुधा भारद्वाज मागील तीन वर्षांपासून भायखळा तुरुंगात आहेत. त्यांना जामीन नाकारला जातोय. न्याय मागू नका, न्याय मागणाऱ्यांसाठी लढू नका हाच त्यामागचा संदेश असल्याचे राऊत यांनी म्हटले. 


'चंद्रू'सारखे उभे राहणारे पोलिसी शिकार


खोटी प्रकरणे, खोट्या केसेसमध्ये अडकवून जंगलातील आदिवासींना एकतर तुरुंगातून सडवले जाते किंवा पोलीस चकमकीत ठार मारले जाते. राजकन्नूलाही पोलिसांनी असेच मारले. जंगलातला हा अत्याचार आणि कायद्याची बेबंदशाही रोखणारे 'चंद्रू'सारखे आज कोणी उभे राहतात तेव्हा त्यांना देशद्रोही, वामपंथी, राज्य उलथिवण्याचा कट रचणारे ठरवून पोलिसी शिकार व्हावे लागते. मुंबईच्या तुरुंगात फादर स्टॅन स्वामी वयाच्या 84 व्या वर्षी मरण पावले. झारखंडच्या जंगलातील आदिवासी, वेठबिगारांच्या हक्कासाठी ते लढत राहिले म्हणून राजसत्ता उलथवण्याचा कट रचल्याचा आरोप ठेवून या विकलांग वृद्धाला आपण तुरुंगातच ठार मारले. छत्तीसगडमध्ये आदिवासींच्या मानवाधिकारासाठी लढणारे प्रा. सुधा भारद्वाज. कवी वरवरा राव हे सगळे मजूर वर्गाच्या हक्कांसाठी लढत राहिले. त्यांच्या भोवती अनेक राजकन्नू त्यांच्या सभोवती होते. त्यांचा आवाज, त्यांचे हक्क चिरडले तेव्हा, स्वामी, सुधा भारद्वाज, वरवरा रावसारखे चंद्रू लढत राहिले. चंद्रू जिंकला असला तरी सुधा भारद्वाज, वरवरा राव स्वतंत्र देशाच्या तुरुंगात सडत पडले असल्याचेही संजय राऊत यांनी म्हटले.


अमृत महोत्सव सोहळे काय कामाचे?


आदिवासींना जगण्याचा हक्कच नसेल तर स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्याचे सोहळे काय कामाचे असा प्रश्न संजय राऊत यांनी विचारला. तुरुंगात लोकांना सडवले जाते व तुरुंगाबाहेर न्यायाची भीक मागावी लागते असे स्वातंत्र्य असल्याचे राऊत यांनी म्हटले. चंद्रूसारखे मोजके लोक अन्यायाविरुद्ध लढा देतात. पण फादर स्टॅन स्वामी, सुधा भारद्वाज. वरवरा राव मात्र लढा देताना सर्वस्व गमावतात. पोलीस, तपाय यंत्रणा खोटी प्रकरणे,  खोटी पुरावे तयार करून लोकांचा कसा छळ करतात हे मुंबईतल्या क्रूझ पार्टी प्रकरणातही दिसले असल्याचे राऊत यांनी म्हटले. कायद्यास आणि न्याय व्यवस्थेसही जातीची, धर्माची वाळवी लागली पण 'जय भीम' म्हणतो, घटनेचे खांब मजबूत आहेत, चिंता नसावी असा विश्वासही संजय राऊत यांनी व्यक्त केला.