Sanjay Raut On Pm Modi : शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर थेट टीका केली आहे. सामनातील रविवारच्या कॉलम 'रोखठोक'मध्ये त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. नरेंद्र मोदी यांच्या भोवती व्यापाऱ्यांची भिंत आहे. मोदी यांनी भारतीय राजकारणाचा एक 'इव्हेंट' केला आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षाला झळाळी आली आहे, असं राऊत यांनी म्हटलं आहे. राऊत आपल्या लेखात म्हणतात की, मोदी यांचे राजकारण उत्सवी स्वरूपाचे आहे. जगभरात राजकारणाचा असा उत्सव कधीच कोणी केला नसेल. मोदी यांच्या उदयानंतर महाराष्ट्रासह देशात भाजपला बळकटी आली. मोदी हेच भाजपचे एकमेव नेते आहेत.निवडणुकांच्या राजकारणात भाजपने यापूर्वी कधीच झाला नसेल इतका पैशांचा वापर सुरू केला, पण मोदी, शाह नव्हते तेव्हा प्रमोद महाजन हे एकमेव नेते होते. त्यांना उद्योग जगतात मुक्त प्रवेश होता व महाजन यांच्यामार्फतच पक्षाला निधी मिळत असे, असं राऊत यांनी म्हटलं आहे. 


...तरीही दोन पक्षांत कधी कटुता आली नव्हती


राऊत यांनी लेखात म्हटलं आहे की,  बाळासाहेब ठाकरेंशी त्यांचे उत्तम संबंध असले तरी बाळासाहेब जाहीरपणे भाजपचा उल्लेख 'कमळी' असा करून खिल्ली उडवत. तरीही दोन पक्षांत कधी कटुता आली नव्हती. जागा वाटपात ठरल्याप्रमाणे शिवसेनेचाच वरचष्मा असे. तरीही प्रत्येक निवडणुकीत भाजपच्या जागा वाटाघाटी व घासाघीस करून वाढत गेल्या, असं राऊतांनी म्हटलं आहे.


त्या भाजपच्या नेत्यांना पूनम महाजन आता नामर्द म्हणणार काय?


संजय राऊत यांनी म्हटलं आहे की, आर. के. लक्ष्मण यांनी त्या काळातल्या वस्तुस्थितीचे वर्णन करणारे एक व्यंगचित्र रेखाटले होते. त्यात बाळासाहेब त्यांच्या खुर्चीवर बसले असून समोरच्या खुर्चीवर त्यांनी पाय ठेवले आहेत. समोर भाजपचे प्रमुख नेते जागा वाटपाची फाइल घेऊन उभे आहेत. पाहुण्यांसाठी असलेल्या खुर्चीवर पाय ठेवून बाळासाहेब म्हणतात, 'या, बसा.' बाजूला एक छोटासा स्टूल दिलाय इतकेच. या चित्राकडे व्यंग म्हणून पाहायला हवे. पण तेव्हा वस्तुस्थिती हीच होती. हे चित्र मी समाज माध्यमांवर प्रसिद्ध करताच पूनम महाजन चिडल्या व म्हणाल्या, 'स्वर्गीय बाळासाहेब व स्वर्गीय प्रमोदजी या दोन मर्दांनी हिंदुत्वासाठी युती केली होती. नामर्दासारखे कार्टून दाखवू नका.' पूनम महाजन या स्वर्गीय प्रमोद महाजन यांच्या कन्या. त्यांच्या भावना मी समजू शकतो, पण दोन मर्दांनी हिंदुत्वासाठी केलेली युती 2014 साली ज्यांनी तोडली त्या भाजपच्या नेत्यांना पूनम महाजन आता नामर्द म्हणणार काय? असा सवाल त्यांनी केला आहे. 


हे सर्व राजकारण कोणासाठी सुरू आहे?


राऊत यांनी लेखात म्हटलं आहे की, महाराष्ट्रात मुंडे-महाजन-खडसे यांनी भाजप वाढवला. विदर्भात गडकरी होते. भाऊसाहेब फुंडकर, महादेव शिवणकरांचेही योगदान होते. आज त्यांचे नामोनिशाण नाही. जेथे आडवाणीच उरले नाहीत, तेथे इतरांचे काय? पंकजा मुंडे या जाहीरपणे पक्षांतर्गत बाबींविषयी नाराजी व्यक्त करतात. पूनम महाजन खासदार आहेत. महाराष्ट्रात काल बाहेरच्या पक्षातून आलेल्यांना केंद्रात मंत्रीपदे मिळाली, पण प्रमोद महाजन यांच्या कन्येस मंत्रीपद मिळाले नाही. गोव्यात एकाच कुटुंबातील अनेकांना उमेदवाऱ्यांची खिरापत दिली, पण मनोहर पर्रीकरांचे पुत्र उत्पल यांना उमेदवारी नाकारताना घराणेशाही चालणार नाही, असे ठणकावले गेले. हे सर्व राजकारण कोणासाठी सुरू आहे? भारतीय जनता पक्षात मोदी-शाहांचा उदय होताच शिवसेना नकोशी व्हावी याचे रहस्य काय? पूनम महाजन म्हणतात त्याप्रमाणे, महाजन-ठाकरे या दोन मर्दांनी हिंदुत्वासाठी केलेली युती 2014 साली तुटली. तेव्हाच मर्दानगीच्या मुद्द्यावर प्रमोद महाजन यांच्या कन्येने निर्भयपणे तोंड उघडायला हवे होते. शिवसेनेकडून युती तुटावी असे कोणतेच अघोरी प्रयोग झाले नाहीत. हिंदुत्ववादी शिवसेनेचे महत्त्व कमी करायचे व अधिकार संपवायचे हे धोरण राबवणारेच भाजपचे आज सूत्रधार आहेत. महाराष्ट्रातील सत्ता त्यांनी गमावली आहे. पण राज्यपालांच्या खांद्यावर बंदूक ठेवून त्यांचा गोळीबार सुरू आहे. आता त्यांना मुंबईवर कब्जा मिळवायचा आहे. म्हणजे महाराष्ट्राच्या राजधानीचा सौदा करायला ते मोकळे झाले. उद्धव ठाकरे यांनी 23 जानेवारीच्या भाषणात भारतीय जनता पक्षाबाबत सत्य कथन केले आहे, असं राऊतांनी लेखात म्हटलं आहे. 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha