मुंबई : यंदा शिवसेना शिंदे गटाचा (Shiv Sena Shinde Group) दसरा मेळावा (Dasara Melava 2024) बीकेसी किंवा आझाद मैदान येथे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शिवसेनेकडून दोन्ही मैदानांचे दसऱ्याच्या दिवशी आरक्षण करण्यात आले आहे. तर दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदानाची मागणी शिंदे गटाने केली नसल्याची माहिती मिळत आहे. यावरून आता शिवसेना ठाकरे गटाचे (Shiv Sena UBT) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शिंदे गटाला टोला लगावला आहे. शिंदेंच्या दसरा मेळाव्याची जागा सुरत किंवा गुवाहाटी आहे, असे त्यांनी म्हटले आहे. 


संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत विविध मुद्द्यांवर भाष्य केले. नितीन गडकरी यांनी सर्व काही सरकारच्या भरवशावर होत नाही, त्यामुळे व्यावसायिकांनी गुंतवणूक प्रक्रियेतून सरकारला दूर ठेवले पाहिजे, माझा तर मत आहे सरकार विषकन्या आहे, सरकार ज्याच्या सोबत जाईल त्याला बुडवते, असे वक्तव्य केले होते. याबाबत विचारले असता संजय राऊत म्हणाले की,  देवेंद्र फडणवीस यांनी सगळ्या लाडक्या बहिणींचा डेटा घेऊन त्यांना व्यक्तिगत पत्र पाठवले आहे. त्यात मुख्यमंत्री हा शब्दच वगळण्यात आला आहे. गडकरी जी जे म्हणत आहे ते बरोबर आहे. पण, जर सरकारच्या तिजोरीत पैसे नसताना अशा प्रकारे पैशाचा अपहार सुरू असेल तर केंद्र सरकारची काही जबाबदारी आहे की नाही? नितीन गडकरी एक ज्येष्ठ नेते आणि जेष्ठ मंत्री आहेत. त्यांनी केंद्रीय मंत्रिमंडळात या विषयावर प्रस्ताव मांडायला हवा, असे त्यांनी म्हटले.  


मुख्यमंत्र्यांना स्वतःला ट्विट करता येतं का?


शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी रामटेकमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह महायुती सरकारवर जोरदार तोफ डागली. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. याबाबत विचारले असता संजय राऊत म्हणाले की, मुख्यमंत्र्यांना स्वतःला ट्विट करता येतं का? आम्ही त्यांना ओळखतो. ट्विट करायला जी माणसं ठेवली आहेत त्यांना नीट ट्रेनिंग द्या. कटोरी घेऊन दिल्लीच्या दरबारात आणि गुजराती व्यापारी मंडळाच्या दरबारात गेल्या अडीच वर्षापासून कोण आहे? उद्धव ठाकरे साहेबांचे काय असेल ते आम्ही पाहू. मोदी आणि शाह यांची भांडी घासायला गुजरातच्या दरबारी सुरतला अडीच वर्षापूर्वी कोण गेले होते? तुम्ही दिल्लीत मोदी आणि शाहांच्या उंबरठ्यावरचं पायपुसणं आहात. दिवशी मोदी आणि शाहांचा हात  ज्या दिवशी तुमच्या डोक्यावरून जाईल त्या दिवशी तुमची महाराष्ट्रात कचऱ्याइतकीही किंमत राहणार नाही. ठाकरे घराण्यामुळेच तुम्ही या पदावर आज पोहोचलेला आहात हे लक्षात घ्या. ठाकरेंवर बोलताना आपला भूतकाळ काय होता हे विसरू नका. 


शिंदेंच्या दसरा मेळाव्याची जागा सुरत किंवा गुवाहाटी 


ते पुढे म्हणाले की, हे लोक दसरा मेळावा घेणार आहेत. मुंबईत घेऊ नका. तुमची दुसऱ्या दसरा मेळाव्याची जागा सुरत आहे. तुमच्या शिवसेनेचा अडीच वर्षांपूर्वी सुरतमध्ये जन्म झाला आहे. त्यामुळे ते दोन ठिकाणी दसरा मेळावा घेऊ शकतात. त्यांनी सुरत आणि गुवाहाटी येथे कामाख्या मंदिरासमोर किंवा रॅडिसन हॉटेलमध्ये दसरा मेळावा घ्यावा. सुरत सर्वात उत्तम आहे, असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे. 


आणखी वाचा


Shiv Sena Dasara Melava : दसरा मेळाव्याच्या जागेचा वाद टळला? शिंदेंचा मेळावा 'या' मैदानावर होण्याची शक्यता, ठाकरेंची तोफ शिवाजी पार्कवरच धडाडणार?