मुंबई : नवरात्री, दिवाळी आणि छट पूजा या सणांच्या काळात विविध शहरांमध्ये नोकरीसाठी स्थलांतर झालेले लोक गावाकडे जात असतात किंवा त्यांच्या राज्यात परत जात असतात. प्रवासासाठी अनेक जण रेल्वेचा पर्याय निवडतात. दिवाळी सारख्या सणांच्या काळातील रेल्वे गाड्यांचं आरक्षित तिकीट अनेकांना मिळत नाही. त्यांच्यासाठी भारतीय रेल्वेनं मोठा निर्णय घेतला आहे. रेल्वेनं नवरात्री, दिवाळी आणि छटपूजा या सणांच्या दरम्यान मोठा विशेष रेल्वेगाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय रेल्वे सणांच्या काळात 519 विशेष रेल्वे चालवणार आहे. या गाड्या 1 ऑक्टोबर ते 30 ऑक्टोबर दरम्यान चालवल्या जाणार आहेत. 


रेल्वे अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार ऑक्टोबर महिन्यात विशेष रेल्वे गाड्या चालवल्या जातात. या वर्षी विशेष रेल्वे गाड्यांच्या संख्येमध्ये वाढ करण्यात आली आहे. नवरात्री, दिवाळी आणि छट पूजा या सणांच्या काळात लाखो प्रवासी रेल्वेतून प्रवास करतात. त्यामुळं दोन महिन्यांच्या काळात विशेष रेल्वेच्या जवळपास 6 हजार फेऱ्या चालवल्या जातील, अशी माहिती त्यांनी दिली.


मध्य रेल्वेच्या माहितीनुसार दिवाळी  आणि छट पूजा या दरम्यान प्रवाशांच्या सेवेसाठी जवळपास 58 रेल्वे गाड्यांच्या 346 फेऱ्या निश्चित करण्यात आल्या आहेत. यापूर्वी म्हणजेच गेल्या वर्षी मध्य रेल्वेनं 50 विशेष ट्रेन चालवल्या होत्या. त्याच्या 275 फेऱ्या झाल्या होत्या. 


पश्चिम रेल्वे 86 फेस्टिवल स्पेशल ट्रेन चालवणार आहे. याच्या एकूण 1382 फेऱ्या होणार आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत पश्चिम रेल्वेनं 21 रेल्वे वाढवल्या असून 270 अतिरिक्त फेऱ्या चालवल्या जाणार आहेत. या रेल्वेगाड्या उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, उत्तर भारत, उत्तर पूर्व भारतात चालवल्या जातील. मुंबईहून देशाच्या विविध भागात जाण्यासाठी 14 विशेष ट्रेन चालवल्या जात आहेत. सूरत आणि उधना येथून देखील विशेष ट्रेन चालवल्या जाणार आहेत. 


विशेष रेल्वे गाड्यांचं तिकीट किती असतं? 


रेल्वेकडून सणांच्या काळात प्रवाशांच्या सोयीसाठी विशेष रेल्वे गाड्या चालवल्या जातात. या गाड्यांचं तिकीट हे नियमित चालवल्या जाणाऱ्या रेल्वे गाड्यांच्या तिकीटापेक्षा महाग असतं. प्रवाशांना त्यासाठी अधिकची रक्कम मोजावी लागते. मात्र, विशेष रेल्वे गाड्यांना देखील प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं पाहायला मिळतं. आयआरसीटीसीच्या वेबसाईटवर विशेष रेल्वे गाड्यांची तिकीट बुक करता येतात. 


इतर बातम्या : 


Mumbai Local :मुंबईकरांसाठी मोठी बातमी, सलग पाच दिवस पश्चिम रेल्वेवरील 150 लोकल रद्द होणार, जाणून घ्या नेमकं कारण...


CM Eknath Shinde: एकनाथ शिंदे यांचाही आनंद दिघेंप्रमाणे घात करण्याचा डाव होता, शिंदे गटाच्या नेत्याचा खळबळजनक दावा