मुंबई : माजी मंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ रामदास कदम यांच्या कथित ऑडिओ क्लिपमुळे जुने विरुद्ध नवीन शिवसेना असा वाद पुन्हा रंगला आहे.  या वादावर मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे नेमकी काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र खात्रीलायक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या सर्व प्रकरणामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चांगलेच संतापले असून, रामदास भाईंवर पक्षांतंर्गत कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. त्या कथित ऑडिओ क्लिपची शहानिशा करून रामदास कदम यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे समजते.


म्हणून कारवाईचा बडगा? 


रामदास कदम हे शिवसेचे ज्येष्ठ नेते असून, माजी मंत्री देखील राहिले आहेत. त्यांची अशा प्रकारे कथित ऑडिओ क्लिप बाहेर येणे योग्य नसल्याची भावना काही शिवसेनेच्या नेत्यांची आहे. त्यामुळे जर आता रामदास कदम यांच्यावर कारवाई केली तर पक्षात यापुढे असे कृत्य करणाऱ्यांवर जरब बसेल असे शिवसेना नेत्यांचे म्हणणे आहे. याचमुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे रामदास कदम यांच्यावर कारवाई करण्याची दाट शक्यता आहे. रामदास कदमांच्या कथित ॲाडिओ क्लिपमुळे पक्ष बदनाम होत असल्याची भावना देखील शिवसेनेच्या काही नेत्यांची आहे. 


पक्षाला बदनाम का करता? 


नुकतीच रामदास कदम यांची कथित ऑडिओ क्लिप समोर आली होती. त्याआधी कोकणातील अनंत गीते यांनी शरद पवार यांच्यावर टीका करत महाविकास आघाडीत दुफळी निर्माण केली होती. याचमुळे या दोन्ही नेत्यांवर सध्या शिवसेनेत नाराजी आहे. बाळासाहेबांच्या काळातले हे शिवसैनिक उद्धव ठाकरेंच्या सरकारमध्ये अडचण निर्माण करत आहेत?एवढी मंत्री पदे मिळूनही माजी मंत्री पक्षाला बदनाम का करत आहेत? असा सवाल आता काही शिवसैनिक विचारू लागले आहेत. 


काय होती भाईंची कथित ऑडिओ क्लिप 


दापोली तालुक्यातील मुरुड येथील रिसॉर्टची माहिती भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांना शिवसेना नेते माजी पर्यावरण मंत्री आमदार रामदास कदम यांनीच पुरवल्याचा गंभीर आरोप माजी आमदार संजय कदम थेट पत्रकार परिषदेत केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर व माजी आमदार संजय कदम यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत ही माहीती दिली. इतकेच नाही तर त्यांनी पुराव्यासाठी मोबाईल वरील संभाषणाच्या ऑडिओ क्लीपच पत्रकार परिषदेत सादर केल्या. शिवसेनेचे नेते रामदास कदम आणि आरटीआय कार्यकर्ता प्रसाद कर्वे यांच्यातील मोबाईलवरील संभाषणाची धवनिफीत उघड केली. त्यामध्ये कर्वे म्हणतात,  ‘भाई… अनिल परब यांच्या वांद्र्यातील कार्यालयावर कारवाई करण्याची ऑर्डर आली आहे. त्यावर रामदास कदम म्हणतात, ‘अरे व्वा..व्हेरी गुड व्हेरी गुड!’ या शिवाय कर्वे हे भाजपा नेते किरीट सोमय्या यांना कागदपत्रे पुरवत आहेत, हे स्पष्ट होणारे संभाषण समोर आले आहे.