मुंबई : यंदाच्या पावसाळ्यातही मुंबईकर खड्ड्यातच जाईल, अशी दाट शक्यता आहे. कारण, शिवसेना-भाजपच्या वादामुळेच मुंबईत जागोजागी सुरु असणारी रस्त्यांची कामं ठप्प पडली आहेत. ठप्प झालेला खडीचा पुरवठा हे रस्त्यांची काम थांबण्यामागचं महत्वाचं कारण आहे.
मुंबईत सध्या जागोजागी जेसिबी, डंपर आणि बॅरिकेटस् उभे आहेत. मात्र, रस्ते बांधण्यासाठीची ही सगळी सामग्री नुसतीच उभी आहे. कारण महापालिकेने कंत्राटदारांना दिलेली रस्त्यांची 255 कामं सध्या ठप्प आहेत. तर केवळ ११४ रस्ते बांधून झाले आहेत.
पण उर्वरित रस्ते दुरुस्तीसाठी खडी कोण देणार यावरुनच शिवसेना आणि भाजपात खडीफेक सुरु आहे. रस्ते दुरुस्तीसाठी शेकडो ठिकाणी खोदून ठेवलेले खड्डे, अपूर्ण रस्ते यातली धुळ यामुळं मुंबईकरांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागत आहे.
एकीकडे मान्सुनपूर्व कामांच्या रखडपट्टीचं सत्र सुरु असताना, दुसरीकडे मात्र नालेसफाई, आणि रस्त्यांची कामे यांची पहाणी करण्याची चढाओढ भाजप-सेनेत सुरु आहे. यामुळे राजकारण चांगलंच तापत आहे.
मात्र, रस्ते दुरुस्ती आणि नालेसफाईचं खरं दिव्य मुंबईकरांना येत्या पावसाळ्यातच पाहायला मिळणार आहे.