भिवंडी : राज्यातलं राजकारण बाजूला ठेवत एकमेकांविरोधात दंड थोपटणारे शिवसेना-भाजप भिवंडी पंचायत समिती सभापती, उपसभापती निवडणुकीत मात्र एकत्र आले आहेत. विशेष म्हणजे शिवसेनेकडे महायुतीमुळे पक्षीय बलाबल जास्त असूनही शिवसेनेने भाजपशी घरोबा करत सामंजस्याने निवडणुका टाळून बिनविरोध निवडणूक पार पाडली.


शिवसेनेने सभापती पद आपल्याकडे ठेवले असले तरी उपसभापती पद भाजपला सोडले आहे. भिवंडी पंचायत समिती सभापतीपदी शिवसेनेचे विकास अनंत भोईर तर उपसभापतीपदी भाजपचे जितेंद्र शाम डाकी यांची वर्णी लागली आहे. शिवसेना-भाजपच्या युतीमुळे दोन्ही पक्षांकडून एक एक अर्ज आला असल्याने पिठासन अधिकारी तहसीलदार शशिकांत गायकवाड यांनी त्यांच्या बिनविरोध निवडीची घोषणा केली.


भिवंडी पंचायत समितीत 42 सदस्य असून शिवसेना 20, भाजपा 19, काँग्रेस 2, मनसे 1 सदस्य असे पक्षीय बलाबल आहे. त्यातच महायुतीमुळे काँग्रेसचे दोन व मनसेचा एक सदस्य देखील आता शिवसेनेसोबत होते. त्यामुळे शिवसेनेकडे एकूण 23 सदस्य व भाजपकडे 19 सदस्य होते. मात्र लोकसभा निवडणुकीत झालेल्या शिवसेना-भाजपच्या केंद्रातील युतीमुळे स्थानिक पातळीवर त्यावेळेसच शिवसेना-भाजपच्या उमेदवारांनी पंचायत समितीचा फॉर्म्युला ठरवला होता, जो आजच्या निवडणुकीत समोर आला आहे.

राज्यात सध्या शिवसेना-भाजप एकमेकांविरोधात दंड थोपटत असूनही भिवंडीत त्याचा काहीच परिणाम दिसला नाही. राज्याच्या राजकारणाला बाजूला सारत शिवसेना-भाजपच्या स्थानिक नेत्यांनी आपल्या सोयीनुसार युती करत सभापतीपदी सेनेचे विकास भोईर तर उपसभापतीपदी भाजपचे जितेंद्र डाकी यांची वर्णी लावत ही निवडणूक बिनविरोध पार पाडली. विशेष म्हणजे नवनिर्वाचित सभापती उपसभापतींना शुभेच्छा देण्यासाठी शिवसेना-भाजपच्या वरिष्ठांनी भिवंडी पंचायत समितीत हजेरी लावली होती.


Politics | ऑक्टोबरपर्यंत सरकार पाडण्याचा पैजा लागल्या; रोखठोकमधून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल