मुंबई : लोकांना लुबाडण्याचे कितीतरी प्रकार तुम्ही ऐकले असतील. मात्र कोविड ऑफिसर म्हणून लुबाडणाऱ्या एकाला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. तर त्याच्या दुसर्याचा शोध पोलिस करत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव सर्वत्र पसरलेला आहे आणि याचाच फायदा काही भामटेसुद्धा घेत आहे. पोलिसांच्या माहितीनुसार अब्दुल शेख हे 30 जून रोजी संध्याकाळी 6 च्या सुमारास चेंबूर येथील सरस्वती विद्यालया समोरून चेंबूर स्टेशनकडे जात असताना त्यांना वाटेत दोन भामटे भेटले. त्यांनी स्वतःला कोविड ऑफिसर म्हणून बतावणी करून अब्दुल शेख यांच्याजवळ असलेल्या सामानाची तपासणी केली. अब्दुल शेखजवळ असलेल्या कॅनरा बँकेचे एटीएम घेऊन हातचलाखीने त्याचा पिन नंबर घेऊन अब्दुल शेख यांच्या अकाउंटमधून 54 हजार रुपये काढून घेतले.
परिस्थिती कशीही असो मात्र काही लोकांना फसविण्याचा आणि त्यांना लुबाडण्याचा मार्ग भामटे शोधूनच काढतात. गेल्या तीन महिन्यांपासून महाराष्ट्र मध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आणि त्याला नियंत्रणात आणण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून लॉक डाऊनची घोषणा करण्यात आली, तीन महिन्यानंतर लॉकडाऊनचे नियम शिथिल केले. मोजक्या कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये बंद असलेले काम आणि उद्योगधंदे सुरू करण्यास महाराष्ट्र शासनाने परवानगी दिली. या कोरोनाच्या परिस्थितीचा फायदा भामटे घेत आता स्वतःला कोविड ऑफिसर म्हणून बतावणी करून लोकांना लुटत आहेत.
मुंबईमध्ये कोविड ऑफिसर म्हणून लुबाडण्याची ही पहिली घटना समोर आली आहे. त्यामुळे जर कोणीही स्वतःला कोवीड ऑफिसर म्हणून भेटत असेल तर याची तात्काळ तक्रार संबंधित पोलिस स्टेशनमध्ये करा कारण असं कुठलंही पद नाही आहे.
अब्दुल शेख बरोबर घडलेल्या या घटनेची तक्रार त्याने तात्काळ चेंबूर पोलीस स्टेशनमध्ये केली आणि याची गंभीर दखल घेत पोलिसांनी शोध सुरू केला. सीसीटीव्हीच्या सहाय्याने घटनास्थळी पोलिसांना एक होंडा सिटी गाडी दिसली, याच गाडीमध्ये हे दोन्ही भामटे आले होते. याचा तपास सुरू करत मुंबई पोलीस आरोपी पर्यंत पोचले. आरोपी सोहन वाघमारे याला पोलिसांनी अटक करून त्याच्या जोडीदाराचा शोध आता सुरु केला आहे. सोहन वाघमारे हा चुनाभट्टी परिसरातच राहणार असून त्याच्याकडून पोलिसाने कॅनरा बँकेचे एटीएम कार्ड, होंडा सिटी गाडी जप्त केली आहे. सोहन वाघमारे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर आधीसुद्धा सायन पोलीस स्टेशन आणि नेहरूनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल आहेत.
चेंबूर पोलिसांनी सोहन वाघमारेला अटक केली असून कलम 420,34 अंतर्गत गुन्हा नोंदवला असून पोलिस पुढील तपास करत आहेत तसेच त्याच्या जोडीदाराचा शोधसुद्धा घेत आहेत. लोकांनाही पोलिसांकडून आवाहन करण्यात आले की कोविड ऑफिसर म्हणून कोणी तुम्हाला सांगत असेल तर त्याच्यावर विश्वास ठेवू नका आणि पोलिसांशी तात्काळ संपर्क करावा.
मुंबईत कोविड ऑफिसर म्हणून लोकांना लुटणाऱ्या भामट्यांचा सुळसुळाट,एकाला अटक
दीपेश त्रिपाठी, एबीपी माझा
Updated at:
05 Jul 2020 03:09 PM (IST)
चेंबूर पोलिसांनी आरोपी सोहन वाघमारेला अटक केली असून कलम 420,34 अंतर्गत गुन्हा नोंदवला असून पोलिस पुढील तपास करत आहेत तसेच त्याच्या जोडीदाराचा शोधसुद्धा घेत आहेत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -