मुंबई : "मातोश्री हे आमचे श्रद्धास्थान आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी आम्हाला सांगितलं तर आम्ही नक्कीच मातोश्रीवर जाऊ अशी भूमिका भिवंडी ग्रामीण विधानसभेचे आमदार शांताराम मोरे यांनी स्पष्ट केली आहे.  


शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठाणे जिल्ह्यातून सर्व पाचही आमदार मुख्यंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी झाले आहेत. बंडखोरी केलेल्या सर्वच आमदारांनी शिंदे गटात जाण्याची कारणं सांगितली आहेत. शांताराम मोरे यांनी देखील कारण सांगितलं आहे.  मतदारसंघातील कामांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस पक्षांच्या मंत्र्यांकडून निधी दिला जात नसल्याचा आरोप शांताराम मोरे यांनी केलाय. निधी मिळत नसल्यामुळे जनतेच्या रोषाला आम्हाला सामोरे जावे लागत होते. तर  काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शिवसेना संपवण्याच्या मागे लागले होते असा आरोप मोरे यांनी केलाय. 


भिवंडी वाडा मनोर रस्ता, मानकोली खारबाव चिंचोटी वसई रस्ता, भिवंडी ठाणे रस्त्यावरील अंजुरफाटा ते कशेळी मार्ग या सर्वच रस्त्यांची मागील तीन वर्षांपासून वाहतात झालेली आहे. त्याचे खापर स्थानिक आमदारांवर नागरिकांकडून फोडलं जात आहे. यासाठी वेळोवेळी पत्रव्यवहार करून देखील संबंधित विभागाने त्याला दाद दिली नाही. त्यामुळेच आमची घुसमट या बंडाच्या माध्यमातून बाहेर आली, अशी माहिती शांताराम मोरे यांनी दिलीय. 


गुवाहाटी वरून परतल्यानंतर शांताराम मोरे अद्याप आपल्या निवासस्थानी थांबून राहिलेले आहेत. या दरम्यान त्यांना असंख्य नागरिक आणि शिवसेना पदाधिकारी खासगीत येऊन भेटून जात आहेत. त्यावेळी आम्ही आमची भूमिका येणाऱ्या प्रत्येकासमोर सांगत आहोत आणि त्यांना सुद्धा ती भूमिका पटत आहे. त्यामुळेच भिवंडी ग्रामीण भाग असेल किंवा ठाणे जिल्हा ग्रामीण भागामध्ये एकनाथ शिंदे यांच्या बंडा नंतर कोणतेही आंदोलन कोणी केले नाही, कारण या ठाणे जिल्हा ग्रामीणमधील शिवसेना पदाधिकारी शरीराने  उद्धव ठाकरे यांच्यासोबत असले तरी मनाने ते एकनाथ शिंदे यांच्या सोबत आहेत, असे शांताराम मोरे यांनी म्हटले आहे.