मुंबई : शिवडीमधून निवडणूक लढणारे मनसेचे उमेदवार बाळा नांदगावकर यांचा पत्ता कुठला आहे? ते राहतात कुठे? असा सवाल शिवसेना ठाकरे गटाचे शिवडीतील उमेदवार अजय चौधरी यांनी विचारला. तसेच बाळासाहेबांची शिवसेना म्हणणाऱ्यांनी शिवडीत उमेदवार का दिला नाही? असा प्रश्नही अजय चौधरी यांनी विचारला आहे. 


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये ठाकरे गटावर टीका केली होती. त्या टीकेला प्रत्युत्तर देताना अजय चौधरी म्हणाले की, बाळासाहेबांचा शिवसेना बोलणाऱ्यांनी शिवडीत उमेदवार का दिला नाही? याच शिवडी विधानसभेला बाळासाहेब कवचकुंडले बोलायचे.शिंदेंनी उमेदवार न देणं हाच आमचा विजय आहे.


शिंदेंना समजेल आता भाजप काय आहे 


शिंदे गटावर टीका करताना अजय चौधरी म्हणाले की, भाजपने राज ठाकरेंना जवळ केलंय. आता तरी शिंदेंनी धडा घ्यावा. भाजप शिंदेच्या पाठीत खंजीर खुपसणार तेव्हा त्यांना समजेल.आता शिंदेंची गरज संपली आहे. आम्हाला भाजपचा अनुभव आहे.


शिवडीतील नाराजीनाट्यावर पडदा


मुंबईतल्या शिवडीत विद्यमान आमदार अजय चौधरी यांना पुन्हा उमेदवारी देण्याचा ठाकरेंच्या शिवसेनेचा निर्णय विधानसभा संघटक सुधीर साळवी यांनी उद्धव ठाकरेंचा मान राखून खिलाडूवृत्तीनं स्वीकारला होता. पण शिवडीतल्या त्या नाराजीनाट्यावर आमदार आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत पडदा पडला. निमित्त होतं अजय चौधरी यांच्या शिवडीतल्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन. 


या कार्यक्रमात आधी आदित्य ठाकरे यांनी सुधीर साळवी यांना कडकडून आलिंगन दिलं. त्यानंतर सुधीर साळवी, अजय चौधरी, आदित्य ठाकरे आणि दगडूदादा सकपाळ यांनी एकमेकांच्या कमरेत हात घालून विजयाची खूण केली. शिवडी मतदारसंघात आपण अजय चौधरींच्या खांद्याला खांदा लावून ठाकरेंच्या शिवसेनेचा प्रचार करणार असल्याचं सुधीर साळवींनी सांगितलं.


भाजपचा बाळा नांदगावकरांना पाठिंबा


मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी मुंबईतल्या शिवडी विधानसभा मतदारसंघात मनसे उमेदवार बाळा नांदगावकर यांना भाजपचा पाठिंबा जाहीर केला. शिवडी विधानसभा मतदारसंघात झालेल्या मेळाव्यात बोलताना त्यांनी ही भूमिका जाहीर केली. मुंबईतल्या 36 पैकी 35 मतदारसंघात महायुतीचे उमेदवार आहेत. पण शिवडीत महायुतीचा उमेदवार नाही याकडे त्यांनी लक्ष वेधलं. उद्धव ठाकरेंच्या सेनेला मतदान करणं आता बस्स झालं. यंदा मनसेच्या बाळा नांदगावकर यांना आपल्याला मतदान करायचं आहे, अशी घोषणा आशिष शेलार यांनी केली. या मेळाव्यात बोलताना आशिष शेलार यांनी ठाकरेंच्या शिवसेनेचे विधानसभा संघटक सुधीर साळवी यांच्यावरही टीका केली.


ही बातमी वाचा: