Protest For Conservation of Forts in Maharashtra : राज्यातील गडकिल्ल्यांची फार दुरावस्था झाली आहे. या पार्श्वभूमीवर शिवप्रेमी आक्रमक झाले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी (Fort Conservation) स्वतंत्र महामंडळ स्थापन करावे, या मागणीसाठी आज मुंबईमध्ये आंदोलन सुरु आहे. मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून या आंदोलनाला सुरुवात करण्यात आली. आंदोलक सीएसएमटी येथून मंत्रालयाकडे रवाना झाले. मात्र, या आंदोलकांना रोखण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला. पहाटेपासून या आंदोलनासाठी राज्यभरातून शिवप्रेमी जमायला सुरुवात झाली होती. सुमारे पाचशे आंदोलक सध्या मंत्रायलयाच्या दिशेने कूच करत आहेत. मात्र, पोलिसांनी आंदोलकांना अडवलं आहे.


पोलिसांकडून आंदोलकांना समजावण्याचा प्रयत्न


फोर्ट येथील चाफेकर बंधू चौकामध्ये सगळे आंदोलन जमा झाले आहेत आणि संपूर्ण रस्ता ब्लॉक करण्यात आला आहे. या सर्व आंदोलकांना पोलीस समजावण्याचा प्रयत्न करत आहेत मात्र आंदोलक ऐकायला तयार नाहीत. पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापटी सुरू आहे. सर्व आंदोलकांना आझाद मैदानात जाण्यास पोलीस विनंती करत आहेत, मात्र आंदोलक ऐकायला तयार नाहीत. महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, नगर या जिल्ह्यातून जास्त शिवप्रेमी आंदोलनासाठी जमले आहेत.


चाफेकर चौकात आंदोलकांचा ठिय्या


गेल्या एक तासापासून गड किल्ल्यांच्या संवर्धनासाठी आंदोलन करणारे शिवप्रेमी चाफेकर बंधू चौकात ठाण मांडून बसलेले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना इथे बोलवावे त्यांना निवेदन द्यायचे आहे, अशी आंदोलकांची मागणी आहे. मात्र पोलीस त्यांना पुढे जाऊ देत नाहीत त्यामुळे रस्त्यावरच सर्वजण बसले आहेत. आंदोलन वेगवेगळी शिवगीते गात आहेत. या आंदोलकांना आझाद मैदानात जाऊन आंदोलन करण्यासाठी पोलीस विनंती करत आहेत, मात्र आंदोलक ऐकायला तयार नाहीत. गड संवर्धनासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करावे ही मुख्य मागणी या आंदोलकांची आहे.


मंत्र्यांच्या बंगल्यांना किल्ल्यांची नावं देण्यात आलेली आहेत. सर्व शिवप्रेमींना मंत्रालयाच्या बाहेर आणि किल्ल्यांची नावे असलेल्या मंत्र्यांच्या बंगले असलेल्या ठिकाणी जायचे आहे. पण पोलिसांनी आंदोलकांना रोखलं आहे. पोलीस आंदोलकांना आझाद मैदान येथे आंदोलन करण्यास सांगत आहेत. त्यामुळे मतभेद निर्माण झाल्याने मोर्चा आझाद मैदान समोरील रस्त्यावर मध्येच थांबला आहे. पोलीस त्यांना अडवण्यासाठी अधिक फौज मागवत आहेत. फक्त बंगल्यांना किल्ल्यांची नावे देण्याऐवजी त्या-त्या किल्ल्याच्या संवर्धनाची जबाबदारीही घ्या, अशी आंदोलक शिवप्रेमींची मागणी आहे.