मुंबई : यंदाचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारावर (Shiv Chhatrapati Award) नोंदवलेल्या आक्षेपावर आधी निर्णय घ्या व त्यानंतरच हा पुरस्कार प्रदान करा, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारला दिले आहेत. त्यामुळे सतत वादांमुळे चर्चेत असलेल्या हा पुरस्कार यंदा पुन्हा चर्चेचा विषय आहे.
साल 2019-20, 20-21 व 21-22 या तीन वर्षांचा राज्य क्रीडा पुरस्कार राज्य शासनानं नुकताच जाहीर केलाय. यात मॅार्डन पेंटाथलॅान या क्रीडा प्रकारात उत्कृष्ट कामगिरी करुनही पुरस्कार जाहीर करताना डावलले गेल्याचा आरोप करत विराज परदेशी या खेळाडूनं क्रीडा विभागाकडे आक्षेपही नोंदवला होता. मात्र त्यावर कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे हा पुरस्कार आपल्याला दिला जावा, अशी मागणी करणारी याचिका विराज परदेशीनं ॲड. संजय क्षीरसागर यांच्यामार्फत दाखल केली होती. न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर या याचिकेवर बुधववारी सुनावणी झाली. यावर याचिकाकर्त्यांनी नोंदवलेला आक्षेप व त्यांचे म्हणणे ऐकून घ्यावं आणि त्यावर नियमानुसार निर्णय घ्यावा. त्यानंतरच यंदाचा हा पुरस्कार वितरीत करावा, असे आदेश राज्य शासनाला देत हायकोर्टानं ही याचिका निकाली काढली.
क्रीडा दिनी पुरस्कार सोहळा
29 ॲागस्ट रोजी 'क्रीडा दिनी' शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार सोहळा आयोजित केला जातो. कोरोनामुळे गेली तीन वर्षे हा पुरस्कार सोहळा झालेला नाही. माजी राज्य क्रीडा मंत्री गिरीष महाजन यांनी या पुरस्काराची घोषणा केली होती. राज्यभरातील खेळांडूंसाठी हा पुरस्कार अतिशय प्रतिष्ठेचा मानला जातो. या पुरस्कारासाठी एक स्वतंत्र निवड समिती आहे. या समितीचे अध्यक्ष हे क्रीडा मंत्रीच असतात. समितीची बैठक झाल्यानंतर पुरस्काराची घोषणा होते. मात्र या बैठकीला माजी क्रीडा मंत्री गिरीष महाजन उपस्थित नव्हते त्यामुळे ही बैठकच झाली नाही, तरीही या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली, असा आरोप याचिकेत करण्यात आला होता.
यासह कबड्डीपटू विराज लांडगे व मल्लखांब खेळाडू ऋषिकेश अरणकल्ले यांनीही या पुरस्कारावर आक्षेप घेत याचिका केलेली आहे. उत्कृष्ट कामगिरी करुनही पुरस्कार दिला जात नाही, असा आरोप या याचिकेतून करण्यात आला आहे. ॲड. वैभव उगले यांच्यामार्फत दाखल करण्यात आलेल्या या याचिकांवर गुरुवारी सुनावणी होणार आहे.
शिवछत्रपती पुरस्काराचं वर्गीकरण
- जीवन गौरव
- उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक
- जिजामाता पुरस्कार (क्रीडा मार्गदर्शक)
- खेळाडू
- साहसी खेळ
- दिव्यांग खेळाडू
हे ही वाचा :