मुंबई : शीना बोरा हत्याकाड प्रकरणातील गुप्त साक्षीदार नंबर 11 चा सीबीआयने घेतलेला जबाब आणि संबंधीत कागदपत्रे पीटर मुखर्जीला देण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने सीबीआयला दिले आहेत. यामुळे पीटर मुखर्जीला न्यायालयात आपली बाजू मांडण्यास मदत होईल, असं पीटर मुखर्जीच्या वकिलांचे म्हणणे आहे.

शीना बोरा हत्याकांड प्रकरणात इंद्राणी मुखर्जी, श्यामवर राय आणि संजीव खन्ना यांना मुंबई पोलिसांनी अटक केली होती तर पीटर मुखर्जीला सीबीआय ने अटक केली होती. या प्रकरणी सीबीआयने आरोपपत्र दाखल केल्यानंतर काही महिन्यांनी 11 नंबर गुप्त साक्षीदाराचा जबाब सीबीआयने विशेष सीबीआय न्यायालयात दाखल केला होता. तो जबाब आपल्याला मिळावा अशी मागणी पीटर मुखर्जीने विशेष सीबीआय न्यायालयात केली होती.

विशेष सीबीआय न्यायालयाने पीटर मुखर्जीची ती मागणी फेटाळून लावली होती. त्या विरोधात पीटर मुखर्जीने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती त्यावर आज सुनावणी अंती पीटर मुखर्जी हा प्रकरणातील आरोपी असून त्याच्या विरोधातील सर्व गोष्टींची माहिती जी सीबीआय त्याच्या विरोधात पुरावे म्हणून सादर करणार आहेत. त्या सर्व गोष्टी पीटर मुखर्जीला मिळणे हा एका आरोपीचा अधिकार आहे असं मत नोंदवत मुंबई उच्च न्यायालयाने पीटर मुखर्जीला शीना बोरा हत्याकाड प्रकरणातील गुप्त साक्षीदार नंबर 11 चा सीबीआयने घेतलेला जबाब आणि संबंधीत कागदपत्रे पीटर मुखर्जीला देण्याचे आदेश सीबीआयला दिले आहेत.