मुंबई : शीना बोरा हत्याकांडातील आरोपी पीटर मुखर्जीची अखेर मुंबईच्या आर्थर रोड जेलमधून सुटका करण्यात आली आहे. आपली सावत्र मुलगी शीना बोरा हिच्या हत्याकांडात सामिल असल्याच्या आरोपाखाली पीटरला चार वर्षांपूर्वी अटक झाली होती. मात्र प्रथमदर्शनी या संपूर्ण प्रकारात पीटरचा थेट सहभाग असल्याचे सबळ पुरावे तपासयंत्रणेकडे उपलब्ध नसल्याचं महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवत हायकोर्टानं पीटर मुखर्जीला 2 लाखांचा जामीन 6 फेब्रुवारी रोजी मंजूर केला होता. मात्र सीबीआयने याला जोरदार विरोध करत सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी वेळ मागितल्याने हायकोर्टाचे न्यायमूर्ती नितीन सांबरे यांनी या निर्णयाला सहा आठवड्यांची स्थगिती दिली होती. मात्र सीबीआयने सर्वोच्च न्यायालयात दादच न मागितल्यानं अखेरीस पीटर मुखर्जीची शुक्रवारी सुटका करण्यात आली.


याआधीही अनेकदा पीटरने केलेला जामीनासाठीचा अर्ज कोर्टाने फेटाळून लावला आहे. काही महिन्यांपूर्वी वैद्यकीय कारणांसाठी मुंबई उच्च न्यायालयाने पीटरला तात्पूरता जामीन मंजूर केला होता. प्रकृती अस्वस्थ्याचं कारण लक्षात घेत पीटरला त्याच्या पसंतीच्या खाजगी रूग्णालयात 15 दिवसांसाठी दाखल करण्यास हायकोर्टाने परवानगी दिली होती. विशेष सीबीआय कोर्टाने जामीन अर्ज फेटाळून लावल्यानं पीटरने हायकोर्टात अर्ज केला होता. तपासयंत्रणेकडे आपल्याविरोधात सबळ पुरावे नाहीत, असा पीटरचा या याचिकेत दावा होता. पीटर मुखर्जीला 16 मार्च 2019 ला हृदयविकाराचा सौम्य झटका आला होता. त्यानंतर कोर्टाच्या संमतीने त्याला शस्त्रक्रियेसाठी खासगी रूग्णालयात हलवण्यात आले होते. तेव्हापासून पीटर मुखर्जीची प्रकृती काहीशी नाजूकच आहे.


शीना बोरा ही इंद्राणीची मुलगी असून तिची हत्या साल 2012 मध्ये इंद्राणीने घडवून आणल्याचा आरोप पोलिसांनी ठेवला आहे. या कटाची संपूर्ण माहिती इंद्राणीचा पती पीटर मुखर्जीलाही होती, असा सीबीआयचा आरोप आहे. विशेष म्हणजे हत्येनंतर तीन वर्षांनी या प्रकरणाचे गूढ उलगडले होते. याप्रकरणी इंद्राणी मुखर्जीने, तिचा पूर्व पती संजीव खन्ना आणि आपला ड्रायव्हर श्यामवर राय यांच्यासाथीनं शीनाची हत्या केली होती. श्यामवर रायला बेकायदेशीर शस्त्र बाळगल्याप्रकरणी अटक झाली होती, ज्याच्या चौकशीत या हत्याकांडाची माहिती मिळाली. पुढे श्यामवर राय हा माफीचा साक्षीदार झाल्याने या संपूर्ण प्रकरणाचा उलगडा झाला.