वसई : राज्यातील सरकार हे आपल्या वादग्रस्त मंत्र्यांना पाठिशी घालत असल्याचा आरोप राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी वसईमध्ये केला आहे. वसईत त्या माघी गणेश दर्शनासाठी तसेच महिला हळदी कुंकुसाठी उपस्थित होत्या. धनंजय मुंडे आणि पूजा चव्हाण प्रकरणावर बोलताना त्यांनी हे सरकार आपल्या मंत्र्यांना वाचवत असल्याचा आरोप केला. त्या म्हणाल्या की काही प्रकरणात अनेकांची नावे येत आहेत. मात्र तपास योग्य दिशेने होत नाही. पोलिसांनी योग्य दिशेने या सर्व प्रकरणाचा तपास करणं गरजेचं असल्याचही मत शर्मिला ठाकरे यांनी व्यक्त केलं.


शर्मिला ठाकरे म्हणाल्या की, लोकांची कामे सरकारच्या दरबारात होत नसल्याने लोक राज ठाकरेंच्या दरबारात काम घेवून येतात. आम्ही रस्त्यावर उतरुन लोकांची कामे करतो. सरकारनंही बाहेर उतरुन जनतेची कामे केली पाहिजेत, असं मत शर्मिला ठाकरे यांनी व्यक्त केलं. पुन्हा लॉकडाऊन होणार का? या प्रश्नावर उत्तर देताना शर्मिला ठाकरे म्हणाल्या की, सरकारने दोन्ही बाजूचा विचार केला पाहिजे. नागरिकांचं आयुष्य महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर नागरिकांची नोकरीही महत्त्वाची आहे. त्यामुळे ज्यांच्या कोरोनाकाळात नोकऱ्या गेल्या आहेत. त्यांना सरकारनं आर्थिक मदत दिली पाहिजे, असं मतही शर्मिला ठाकरे यांनी व्यक्त केलं. यावेळी वसई विरार महानगरपालिकेत मनसे ताकदीने लढेल असं सांगताना निवडणुकांमध्ये स्वतः सक्रिय असणार असल्याचंही यावेळी सांगितलं आहे.


शर्मिला ठाकरे या आज वसईत दोन कार्यक्रमासाठी उपस्थित होत्या. वालीव गावात त्यांनी माघी गणेश मंडळाला भेट दिली. त्याच बरोबर माजी नगरसेवक प्रफुल्ल पाटील यांच्या घरीही त्यांनी भेट दिली. तसेच वसईत ग्रीष्मा गार्डन येथे मनसे आयोजित हळदी कुंकु कार्यक्रमालाही भेट दिली होती. यावेळी महिला वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होता.