मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांविरोधात केलेल्या आक्षेपार्ह्य वक्तव्याप्रकरणी आता सर्वच स्तरातून टीकेची झोड उठली आहे. राज्यभरात शिवसैनिक आक्रमक झाले असून ठिकठिकाणी आंदोलने होत आहेत. तर नाशिक आणि पुण्यात राणेंविरोधात गुन्हे दाखल झाले असून त्यांना अटक होण्याची शक्यता आहे. काँग्रेस आणि राष्ट्रावादी काँग्रेसच्या नेत्यांनाही राणेंवर टीका केली आहे. यावर आता राष्ट्रावादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रतिक्रिया आली आहे. राणे प्रकरणांवर पवार यांना विचारले असता मी महत्व देत नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
दरम्यान, संभाव्य अटकेबाबात नारायण राणे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. मी कोणताही गुन्हा केलेला नाही, माझं वक्तव्य हे गुन्हा नोंदवण्याचं वक्तव्य नाही, कोणत्याही गुन्ह्याची मला कल्पना नाही, त्यामुळे ऐकीव माहितीवर मी बोलणार नाही. जेव्हा प्रसाद लाड यांनी शिवसेना भवनावर वक्तव्य केलं होतं, त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी थापड देऊ असं वक्तव्य केलं होतं. त्या विधानावर गुन्हा का दाखल होत नाही, असा प्रतिसवालही नारायण राणे यांनी उपस्थित केला आहे. तसेच आमचंही सरकार केंद्रात आहे, राज्याची उडी कितपत जाते ते पाहुयात, असाही सूचक इशारा नारायण राणे यांनी दिला आहे.
नारायण राणेंच्या वक्तव्याच्या पाठीशी नाही, पण त्यांच्या पाठीशी मात्र भाजप ठाम उभा : फडणवीस
नारायण राणे यांच्या वक्तव्याचं आम्ही समर्थन करणार नाही, पण ज्या पद्धतीने सरकारकडून पोलिसांचा गैरवापर सुरु आहे ते पाहता आम्ही राणे साहेबांच्या मागे संपूर्ण पक्ष म्हणून भक्कमपणे उभे आहोत असं विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस म्हणाले. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सोमवारी मुख्यमंत्र्यांवर टीका करताना आक्षेपार्ह शब्द वापरले त्यावरुन आज महाराष्ट्राचे वातावरण तापलं असून शिवसेनेने राज्यभर आंदोलन सुरु केलं आहे.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वक्तव्याचा काँग्रेस नेत्यांकडूनही समाचार, कोण काय म्हणाले?
काय म्हणाले होते नारायण राणे?
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जनआशीर्वाद यात्रेचा आजचा पाचवा दिवस आहे. दरम्यान या यात्रेला सुरूवात झाल्यानंतर नारायण राणे यांनी शिवसेना आणि महाविकास आघाडी सरकारला लक्ष्य केलं आहे. पण, आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना नारायण राणे यांची जीभ घसरली आहे. रायगडमधील महाड येथे पत्रकार परिषद झाली. यावेळी राणे यांना पत्रकारांनी मंदिरे बंद यासह तिसऱ्या लाटेवर प्रश्न विचारले. त्यानंतर नारायण राणे यांची जीभ घसरली. त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची एकेरी उल्लेख केला. 'आमचे काही अॅडव्हायझर नाहीत? तिसरी लाट कुठून येणार हे याला कुणी सांगितलं? लहान मुलांना कोरोना होणार आहे, अपशकुनासारखं बोलू नको म्हणावं. तसेच स्वातंत्र्यदिनाबद्दल माहिती नसणाऱ्यांनी जास्त काही बोलू नये. यांना स्वातंत्र्यदिन कोणता हे माहित नाही. मी असतो तर त्या दिवशी कानाखाली लगावली असती' असं नारायण यांनी म्हटलं. दरम्यान, यात्रा सुरूवातीपासून राणे यांनी शिवसेनेवर प्रहार केले आहेत. पण, महाड येथील विधानानंतर आता मोठा वाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.