शरद पवार यांनी ‘सामना’ला दिलेल्या मुलाखतीत हे स्पष्ट केलं. शिवसेना नेते तथा खासदार आणि सामनाचे संपादक संजय राऊत यांनी त्यांनी मुलाखत घेतली आहे. या मुलाखतीत शरद पवार यांनी महाराष्ट्रातील ‘ठाकरे सरकार’ला अजिबात धोका नाही, असंही सांगितलं. तसंच देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या सर्व आरोपांना पवारांनी उत्तरं दिली. ही मुलाखत 11, 12 आणि 13 जुलैला प्रसारित होत आहे.
संजय राऊत यांनी तुम्ही हेडमास्तर आहेत की रिमोट कंट्रोल? असा प्रश्न केला असता पवार म्हणाले की, दोन्ही नाही. हेडमास्तर असला तर तो शाळेत असायला हवा. लोकशाहीत सरकार किंवा प्रशासन हे रिमोटने कधी चालत नाही. रिमोट चालतं कुठे? जिथे लोकशाही नाही तिथं! आपण रशियाचं उदाहरण पाहिलं. पुतीन 2036 पर्यंत अध्यक्ष राहणार. ही एकहाती सत्ताच आहे. लोकशाही वगैरे सगळे बाजूलाच केलेले आहे. त्यामुळे आपण म्हणू त्या पद्धतीने सरकार चालवले पाहिजे हा अट्टहास आहे, पण इथे लोकशाही सरकार आहे आणि लोकशाहीचे सरकार रिमोट कंट्रोलने कधी चालू शकत नाही. मलाच ते मान्य नाही. सरकार मुख्यमंत्री व त्यांचे मंत्रिमंडळच चालवत आहेत, असं पवार म्हणाले.
मुलाखतीत शरद पवार यांनी म्हटलं की, बाळासाहेब ठाकरे व उद्धव ठाकरे यांच्या कार्यपद्धतीत फरक आहे. पण मुख्यमंत्री म्हणून ठाकरे उत्तम काम करीत आहेत, असे प्रमाणपत्र शरद पवारांनी दिले. महाराष्ट्र या कोरोनाच्या संकटातूनही बाहेर पडेल व झेप घेईल, असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला.
महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी
महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी झाल्याचं पवार यांनी म्हटलं आहे. हा प्रयोग आणखी यशस्वी होऊन या प्रयोगाची फळं महाराष्ट्रातील जनतेला, महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या विभागाला मिळताहेत अशी स्थिती आपल्याला नक्कीच बघायला मिळाली असती. पण हे कोरोनाचं संकट आलं हे दुर्दैव आहे महाराष्ट्राचं, असं पवार म्हणाले. गेले काही महिने राज्य प्रशासन, आणि राज्यकर्ते आणि राज्याची संपूर्ण यंत्रणा फक्त एकाच कामात गुंतलेली आहे, कोरोनाविरुद्ध लढण्याच्या. त्यामुळे बाकीचे सगळे प्रश्न बाजूला राहिले.
तिन्ही पक्ष एका विचारानं मुख्यमंत्री ठाकरेंच्या पाठीशी
पवार म्हणाले की, कोरोनासारखं एवढं मोठं संकट तीन विचाराचे तीन पक्ष, पण सगळे जण एका विचारानं मुख्यमंत्री ठाकरे यांच्या पाठीशी आहेत. त्यांच्या धोरणाच्या पाठीशी आहोत, आणि या परिस्थितीला तोंड देताहेत. लोकांच्या पाठीशी मजबुतीने उभे राहताहेत. हे घडू शकलं याचा अर्थ माझी खात्री आहे, हे एकदिलाने काम सुरू आहे म्हणून घडू शकलं. या तिन्ही पक्षांत यत्किंचितही नाराजी नाही, असं त्यांनी सांगितलं.