मुंबई: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणी येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्याची दुर्घटना घडली त्या प्रकरणावरून राज्यामध्ये संतापाची लाट अजूनही कायम असल्याचं दिसून येत आहे. महायुती सरकारमधील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार,  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर जाहीर माफी मागितल्यानंतर राज्यात महाविकास आघाडीने आज जोडे मारो आंदोलन केलं आहे. मुंबई पोलिसांकडून परवानगी मिळाली नसतानाही आज (1 सप्टेंबर) महाविकास आघाडीचे दिग्गज नेते मुंबईमधील हुतात्मा चौकात पोहोचले. कोणत्याही परिस्थितीत हुतात्मा चौक ते गेटवे ऑफ इंडिया असा मोर्चा काढला, यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार(Sharad Pawar) यांनी जमलेल्या आंदोलकांना संबोधित केलं यावेळी बोलताना त्यांनी महायुती सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. 


वाऱ्यामुळे पुतळा पडला, असं सांगितलं जातं. गेटवेवर हा पुतळा गेली 50 वर्षांपासून आहे. पण तो अजूनही टिकून आहे. अनेक ठिकाणी छत्रपती महाराजांचे पुतळे उभे आहेत, या परिसरात असलेला पुतळा गेली अनेक वर्षे देखील लोकांना प्रेरणा देत आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यात असे अनेक पुतळे आहेत, पण मालवणच्या भागात उभारलेला पुतळा हा भ्रष्टाचाराचा नमुना होता मालवणमधील पुतळ्याच्या उभारण्यात भ्रष्टाचार झाला आहे. त्यामुळे पुतळा पडला. हा शिवप्रेमींचा अपमान आहे, असं शरद पवार(Sharad Pawar) म्हणाले.


काय म्हणालेत शरद पवार?


आज इंडिया येथे शिवाजी महाराज यांचा पुतळा आहे. गेले 50 वर्षे हा पुतळा लोकांचा प्रेरणा देत आहे. सागरी किनाऱ्यावर हा पुतळा आहे. महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात असे अनेक पुतळे आहेत. पण, मालवणच्या भागात उभा करण्यात आलेला पुतळा भ्रष्टाचाराचा नमुना होता. पुतळ्याच्या उभारणीत भ्रष्टाचार झाला हा जनमानसांत पक्का समज आहे. हा शिवछत्रपतींचा अपमान आहे. त्यामुळे संपूर्ण देशातील शिवप्रेमींचा अपमान आहे. हा अपमान करण्याची भूमिका ज्यांनी घेतली, त्यांचा निषेध करण्यासाठी ही मोहिम होती.


मोर्चाला परवानगी नाही, मुंबईत कडक सुरक्षा


मुंबई पोलिसांनी महाविकास आघाडीला (एमव्हीए) आंदोलनाला परवानगी दिलेली नाही. यानंतरही विरोधक मोर्चे काढत आहेत. विरोधकांच्या निदर्शनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. गेट वे ऑफ इंडिया येथे पर्यटकांच्या ये-जा करण्यावर बंदी घालण्यात आली आहे.


या मोर्चासाठी राज्यभरातील महाविकास आघाडीचे नेते उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, कोल्हापूरचे खासदार शाहू महाराज, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, आमदार आदित्य  ठाकरे, खासदार सुप्रिया सुळे, वर्षा गायकवाड, काँग्रेस नेते भाई जगताप यांच्यासह अनेक नेते आणि हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.