मुंबई : गेल्या काही दिवसांपासून सत्ताधारी आणि विरोधक यांच्या वादात मेट्रो कारशेडचा प्रकल्प प्रलंबित आहे. या वादात केंद्रानेही उडी घेत कांजूरमार्ग येथे होणाऱ्या प्रस्तावित मेट्रो कारशेडला विरोध करत न्यायालयाचे दार ठोठावले आहे. परिणामी या प्रकरणाची गुंता दिवसेंदिवस वाढत चालला आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रावादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार मध्यस्थी करणार असल्याची माहिती मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे.


मुख्यमंत्री आणि शरद पवार यांच्यात या विषयावर चर्चा झाली आहे. पवार म्हणाले याबद्दल कुठे तरी एकोपा निर्माण करायला पाहिजे. मुख्यमंत्री म्हणाले जर वाद सोडून यावर मार्ग निघाला तर बघायला हवा. याबाबत शरद पवार प्रयत्न करत आहेत. गरज पडली तर एकदोन दिवसांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी देखील ते चर्चा करतील. मुंबईच्या विकासात अडथळा नको यासाठी मुख्यमंत्री देखील प्रयत्न करत असून यात पवार मध्यस्थी करत असल्याची माहिती अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे. आधीपासून आमची भूमिका सामंजस्याची आहे. पण काही लोक यात राजकारण करत आहेत. म्हणून पवार साहेब यात मध्यस्थी करत असल्याचे ते म्हणाले.


मुख्यमंत्री अन् विरोधी पक्षनेते यांच्यात आरोप प्रत्यारोप


कांजूर कारशेडच्या मुद्द्यावरुन सध्या विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये जुंपली असल्याचे पाहायला मिळत आहे. कारशेडच्या मुद्द्यावर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, "मेट्रोसाठी आपल्याला स्टेंबलिंग लाईनची आपल्याला आवश्यकता आहे. पहिल्या प्रकल्पात स्टेंबलिंग लाईनचा प्रस्ताव नव्हता हे पाहून मला धक्का बसला. आरेमध्ये पर्यावरण वाचवलं. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची व्याप्तीही वाढवली. कांजूरमार्गला 40 हेक्टर जागा मिळली होती. कांजूरमार्गची जागा ओसाड आहे. कांजूरमार्गला मेट्रोच्या 3, 4 आणि 6 या मार्गिकेचे कारशेड करता येणार होते. यात एक मोठा फरक आहे. जिकडे एका मार्गिकेसाठी कारशेड होणार होतं तिथे इतर लाईनसाठीही कारशेड करता येणार आहे. केवळ एका लाईनसाठी आरेमध्ये प्रकल्प कशासाठी?"


तर, प्रश्न श्रेयाचा नाही, तर मुंबईकरांच्या सोयी-सुविधेचा आहे. श्रेयासाठी काम करणे हा भाजपाचा स्वभाव नाही. पण प्रश्न अपश्रेयाचा जरूर आहे, ते तुमच्या वाट्याला येऊ नये, हीच इच्छा. भविष्यात कोणतीही अतिरिक्त जागा कारशेडसाठी लागणार नसताना दिशाभूल कशाला? 30 मिनिटांच्या संवादातून एक बाब प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे अजूनही आपण महाविकास आघाडी सरकारच्याच उच्चाधिकार समितीचा अहवाल पूर्णतः वाचलेला नाही. एकदा हा अहवाल सार्वजनिक करा. प्रत्यक्ष स्थिती, भूमिका, वास्तविकता महाराष्ट्राच्या जनतेसमोर येईल, असे उत्तर ट्विटरच्या माध्यमातून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे.


संबंधित बातम्या :
एका लाईनसाठी आरेमध्ये प्रकल्प कशासाठी? मुख्यमंत्र्यांचा सवाल, तर देवेंद्र फडणवीस म्हणतात..


केवळ एका लाईनसाठी आरे मध्ये कारशेड का? मुख्यमंत्र्यांचा सवाल


Nawab Malik On BMC Election : मुंबई पालिकेच्या निवडणुका एकत्रित लढाव्या, नवाब मलिक यांचं मत