मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या शनिवारच्या भेटीनंतर राजकीय वर्तुळात नव्या समीकरणांची जोरदार चर्चा सुरु असतानाच, आता आणखी एक चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. कारण, मुंबईतील एका कार्यक्रमानंतर शरद पवारांनी शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकरांना बोलावून, त्यांच्याशी चर्चा केल्याचे फोटो समोर येत आहेत.


मनोहर जोशींच्या 'अवघे पाऊणशे वयमान' पुस्तकाचे प्रकाशन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत झाले. दादरच्या शिवाजी मंदिरात हा कार्यक्रम झाला. हा कार्यक्रम संपल्यानंतर एक दृश्य सर्वांनी पाहिलं आणि पुन्हा अनेक उलटसुलट चर्चा रंगायला सुरुवात झाल्या आहेत.

शिवाजी मंदिराच्या पार्किंगमध्ये शरद पवारांनी शिवसेनेचे सचिव आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय मिलिंद नार्वेकर यांना बोलवून घेतले. आणि त्यांच्या कानात कुजबूज केली. त्यामुळे पवारांनी मिलिंद नार्वेकरांच्या कानात काय सांगितलं असावं? याबाबत राजकीय वर्तुळात विविध तर्क लढवले जात आहेत.

दरम्यान, या कार्यक्रमात बोलताना शरद पवारांनी मनोहर जोशींची मुक्तकंठाने स्तुती केली. "मनोहर जोशी यांचा छंद हा लोकलमधून प्रवास करताना, दुकानाच्या पाट्या वाचन होता. त्यामुळे ते बांधकाम क्षेत्रात येतील असे मला वाटे," अशा मिश्किल शब्दात त्यांनी जोशींच्या कामाचा गौरव केला. तसेच मनोहर जोशी हे अतिशय काटकसरी व्यक्तीमत्त्व असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितलं.

या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे देखील उपस्थित होते. त्यांनी मनोहर जोशींच्या मंत्रिमंडळातील कामांना यावेळी उजाळा दिला.