मुंबई: आत्महत्या करण्यासाठी निघालेल्या महिलेला महिला पोलिसानं आपल्या प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर आत्महत्येपासून परावृत्त केलं.


शालिनी शर्मा असं या जिगरबाज महिला पोलिसाचं नाव असून, त्यांनी एका 32 वर्षीय वकील महिलेला आत्महत्या करण्यापासून रोखलं.

काय आहे प्रकरण?

एक 32 वर्षीय वकील महिला शुक्रवारी सकाळी साडेसातच्या सुमारास वडाळ्यातील एका बांधकाम सुरु असलेल्या इमारतीच्या 18 व्या मजल्यावर चढली. तिथून ती उडी मारुन आत्महत्या करण्याच्या तयारीत होती. इमारतीच्या टोकाला जाऊन ती सेल्फी घेत होती.  त्याचवेळी साईट सुपरवायझरने तिला पाहिलं आणि तातडीने पोलिसांना कळवलं.

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत महिलेला समजावण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मात्र जवळ जाण्याच्या प्रयत्न केल्यास महिला उडी मारण्याची धमकी द्यायची, यामुळे पोलिसही सैरभर झाले.



खबरदारी म्हणून बिल्डिंगखाली सुरक्षा जाळीही लावण्यात आली. मात्र संबंधित महिलेला विनंती करुनही ती ऐकत नव्हती. शिवाय जर कोणी जवळ आलं, तर मी उडी मारेन अशी धमकीही देत होती. त्यामुळे पोलीस हताश झाले होते.

यानंतर पोलिसांनी मग  समुपदेशनात हातखंडा असलेल्या पोलिस निरीक्षक शालिनी शर्मांना खास चेंबूरवरुन पाचारण करण्यात आलं. शालिनी शर्मा दुपारी 12.30 च्या सुमारास घटनास्थळी दाखल झाल्या.

शालिनी शर्मा यांनी संबंधित महिलेशी संवाद साधला. सातत्याने संवाद साधून, चर्चा करुन त्यांनी महिलेचं मन परिवर्तन केलं. दुपारी साडेबारा वाजता सुरु झालेल्या या चर्चेला साडेतीनच्या सुमारास यश आलं.

अखेर शर्मांनी महिलेशी तब्बल 3 तास संवाद साधत आपल्या कौशल्यानं संबंधित महिलेचा जीव वाचवला.

संबंधित महिलेला केईएम रुग्णालयात नेण्यात आलं, त्यानंतर तिला घरी पाठवण्यात आलं.

"लग्न होत नसल्याने संबंधित महिला त्रासली होती. मुलीसाठी चांगला मुलगा मिळत नसल्याने घरचेही वैतागले होते. या मानसिकतेमुळेच तीने आत्महत्या करण्याचा विचार केला होता", असं पोलिसांनी सांगितलं.

कोण आहेत शालिनी शर्मा?

शालिनी शर्मा या मुंबई पोलिसात पोलीस निरीक्षक या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी लंडनमध्ये बंधक/ओलीसांशी वाटाघाटी करण्याचं कौशल्य आत्मसात केलं आहे. त्यामुळेच आत्महत्येचा वगैरे विचार करणाऱ्या व्यक्तींच्या समुपदेशनासाठी त्यांना बोलावलं जातं.